Thursday 7 June 2018

शिक्षक मतदासंघ निवडणूक


शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूक 2018
पसंतीक्रमानुसार मतदान करण्याच्या सुचना

       नाशिक  दि. 07 : महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदासंघ द्विवार्षिक निवडणूक 2018 साठी सोमवार 25 जून 2018 रोजी मतदान होणार असून पसंतीक्रमानुसार मतदान करण्याबाबत उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.
          मतदान करण्यासाठी मतदान अधिकारी क्र. 3 यांचेकडून मतपत्रिकेसोबत दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मतदान करणे आवश्यक आहे. याशिवाय इतर पेन, पेन्सिल, बॉल पॉइंट पेन यांचा वापर केल्यास मत पत्रिका रद्द होऊ शकते. सदरचे मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर अंकी क्रमांक 1 लिहून मतदान करावे. एक अंक हा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा.
          निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासमोर मतदार त्याच्या निवडीनुसार अंकांमध्ये पसंतीक्रमांकान्वये मतदान करेल किंवा मतदाराला NOTA (None of The Above) या पर्यायचादेखील वापर करता येईल. मतपत्रिकेवर द्यावयाचा पसंतीक्रम हा फक्त मराठी देवनागरी, इंग्रजी, रोमन अशा अंकामध्येच नमूद करणे आवश्यक आहे.
          मतपत्रिकेवर पसंतीक्रम अक्षरी लिहिल्यास, कोठेही स्वाक्षरी केल्यास, आपले नाव किंवा इतर अक्षरे लिहिल्यास अथवा अंगठ्याचा ठसा उमटविल्यास मतपत्रिका बाद होते. तसेच पसंतीच्या उमेदवारापुढे X अशी खुण केल्यासदेखील मतपत्रिका बाद होईल.
          मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम नमूद न करणे, पहिला पसंतीक्रम एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावापुढे दर्शविणे अथवा मतदाराची ओळख पटेल अशारितीने मतपत्रिकेवर चिन्ह किंवा मजकूर नमूद केल्यानेदेखील मतपत्रिका बाद ठरेल, असे श्री. गावडे यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment