Friday 15 June 2018

शाळा प्रवेशोत्सव


जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा उत्साह


ना‍शिक दि.15- विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी... विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्प देवून केलेले स्वागत....शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण म्हणून घेतले जाणारे ‘पहिल्या पावला’चे ठसे...सजवलेल्या बैलगाडीतून काढलेली मिरवणूक....चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह....अशा वातावरणात जिल्ह्यात जिल्हा परिषदेतील शाळांमधून मुलांचा शाळा प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला.


ओझर येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला तहसिलदार विनोद भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, शिक्षण विभाग प्रमुख कैलास बोरसे, मुख्याध्यापिका नुतन पवार आदि उपस्थित होते.

शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमधून घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी इगतपुरी तालुक्यातील रामरावनगर येथे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पिंप्री सैय्यद, जिल्हा सत्र न्यायाधिश सुर्यकांत शिंदे  यांनी खंबाळे येथील शाळेतील उत्सवात सहभाग घेऊन चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.


 शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मुलभूत हक्क असल्याने त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री.राधाकृष्णन यांनी याप्रसंगी सांगितले. मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांना शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


शाळा प्रवेशोत्सवांतर्गत मुलांच्या पायांचे ठसे घेण्यात आले असून हे ठसे जतन करून ठेवण्यात येणार आहेत. मुले शाळा सोडतील तेव्हा शाळेची आठवण म्हणून त्यांना ते भेट म्हणून दिले जातील.


          यावेळी शाळेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. श्री.राधाकृष्णन यांनी मुलांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थदेखील सहभागी झाले.


00000

No comments:

Post a Comment