Sunday 10 June 2018

वर्धापन दिन


आरोग्य विज्ञान विद्यापीठाची वीस वर्षातील कामगिरी कौतुकास्पद
                                            -डॉ.जयश्री मेहता
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 20 वा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न

    
       नाशिक, दि.10:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची गेल्या वीस वर्षातील कामगिरी कौतुकास्पद असून शासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे विद्यापीठाची प्रगती वेगाने होत आहे, असे प्रतिपादन  भारतीय आर्युविज्ञान परिषदे अध्यक्षा डॉ.जयश्री मेहता यांनी केले.
          महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर ,वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.प्रविण शिनगारे, आयुष संचालक कुलदीप राज कोहली, प्रति कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.

          डॉ.जयश्री मेहता पुढे म्हणाल्या, विद्यापीठाने नव्या काळातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा चांगला उपयोग केला आहे. ‘ई-पेमेंट गेटवे’ प्रणाली याचाच एक भाग असून त्यामुळे  विद्यापीठाच्या कामकाजाला गती मिळेल. या प्रणालीचा सकारात्मक परिणाम कामकाजावर दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 विद्यापीठ स्थापनेच्या वेळी संलग्न संस्थांची संख्या 145 होती, ती आज 344 पर्यंत गेली असून विद्यापीठासाठी ही बाब अभिमानस्पद आहे. विद्यापीठाचा विस्तार होत असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्य शिकविण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर आहे. डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताण कमी करण्यासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य आणि संवेदनशिलतेविषयी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अवगत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          श्री.देशमुख यांनी यावेळी 20 वर्षाचा टप्पा यशस्वी पार केल्याबद्दल  विद्यापीठाचे  आणि सर्व गुणवंत विद्यार्थी- प्राध्यापकांचे अभिनंदन केले. त्यांच्या हस्ते ‘ई-पेमेंट गेटवे’  प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

          श्री.म्हैसेकर यांनी आपल्या मनोगतातून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंच्या जीवनावर आधारीत ‘शिल्पकार चरित्रकोशा’च्या 3 ऱ्या भागाचे प्रकाशन लवकर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

          कार्यक्रमात वैद्यकिय विद्याशाखेच्या 7, दंत विद्याशाखा 3 , आयुर्वेद व युनानी विद्याशाखा 11, होमिओपॅथी विद्याशाखा 4 आणि तत्सम विद्याशाखेच्या 15 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

          विद्यार्थी कल्याण विभागाचे पारितोषिक व विविध विद्याशाखांमधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देवून यावेळी गौरविण्यात आले. तसेच वैद्यकिय विद्याशाखेसाठी डॉ. अशोक अनंत महाशूर, डॉ. सैयद अब्दुल सामी, डॉ. विलास दत्तोपंत वांगीकर तर आयुर्वेद विद्याशाखेसाठी डॉ. अनंत भगवंत धर्माधिकारी, डॉ. गांधीदास सोनाजीराव लवेकर, डॉ. पांडुरंग हरी कुळकर्णी  यांना विद्यापीठातर्फे  जीवनगौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.
*******

No comments:

Post a Comment