Wednesday 27 June 2018

सामाजिक न्याय दिन


सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
समता दिंडी, व्याख्यानाचे आयोजन


          नाशिक, 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्यावतीने समता दिंडी आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
            राज्य शासनाच्यावतीने 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या हस्ते समता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राजेंद्र कलाल, सहायक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीधर त्रिभुवन,  प्राचार्य विवेक गायकवाड, विलास देशमुख आदी उपस्थित होते.

          मेहर सिग्नल, अशोक स्तंभमार्गे गंगापूर रोड येथील रावसाहेब सभागृह येथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत केटीएचएम महाविद्यालय, मराठा विद्यालय, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ सोशल वर्क, वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रमाबाई आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या महाविद्यालयातील विद्याथी-विद्यार्थींनींनी सहभाग घेतला.
          रावसाहेब सभागृह येथे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक गायकवाड, प्राचार्य संजय साळवे, विलास देशमुख यांचे राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक समता, शैक्षणिक योगदान याविषयावर व्याख्यान झाले.

          यावेळी प्राचार्य गायकवाड म्हणाले, 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराजांनी राज्यकारभार पाहिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वे समाजात रुजविण्याचे प्रयत्न केलेत. अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्र्यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी अविरत मेहनत घेतली असे त्यांनी सांगितले.
          यावेळी प्राचार्य साळवे म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी वर्णभेद विसरुन एकरुपता दाखविणे गरजेचे आहे. शाहू महराजांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक सुधारणेवर तसेच प्रशासकीय धोरणावर  विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले.    

          प्राचार्य देशमुख म्हणाले, मानवजातीच्या कल्याणासाठी शाहू महाराजांचे योगदान मोठे आहे. वैचारीक श्रृंखलांमधून वैचारीक समृद्धी घडत असते. त्यामुळे विचाराचे आदान प्रदान होणे गरजेचे आहे.  युवा वर्गाने शाहू महारांजाचे विचार आचारणात आणुन तसेच विचार आणि मंथन यांची सांगड घालून सामाजिक परिवर्तन घडवून आणने हे युवापिढीसमोरचे मोठे आव्हान त्यांनी सांगितले.
          यावेळी समाज कल्याण विभागामार्फत शासकीय आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

00000

No comments:

Post a Comment