Friday 6 October 2017

सौरऊर्जेने पाणी

पेसा योजनेतून आदिवासी पाड्यावर सौरऊर्जेने पाणी

नाशिक दि. 5:-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील कळमपाडा आणि वडपाड्यावर राज्य शासनाच्या आमचा गाव आमचा विकास आणि पेसा योजनेतून सौरऊर्जेने पाणी पोहोचविण्यात आल्याने या पाड्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
          कळमपाडा आणि वडपाड्याची लोकसंख्या सातशेच्या घरात आहे. या वस्तीत एक विहिर आणि एक हातपंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असे. विहिरीवर पाच हॉर्सपॉवर क्षमतेची मोटर बसविण्यात आली होती. साठवणासाठी टाकी नसल्याने विद्युत प्रवाह असताना पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असे आणि प्रवाह नसताना महिलांना डोक्यावरून दोन किंवा तीन हंडे ठेवून  पाणी वाहून न्यावे लागे.
          चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीसाठी थेट निधी मिळाल्यावर टाकीचे बांधकाम करण्यात आले. तसेच पाईपलाईनद्वारे वस्तीवर पाणीपुरवठा करण्याची सुविधा करण्यात आली. मात्र विद्युत प्रवाहाचा प्रश्न असल्याने गट विकास अधिकारी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक आर.डी. महाले  यांनी ‘आमचा गाव आमचा विकास आणि  5 टक्के पेसा ग्रामसभा कोष निधी अंतर्गत विहिरीवर सौरपंप बसविण्याचा आराखडा तयार केला.
 महाऊर्जा विभागीय कार्यालयाद्वारे 5 हॉर्सपॉवरचा पंप बसविण्यात आला. यासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आला. मे 2017 मध्ये सौर पंप बसविण्याचे काम पुर्ण झाले. ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास यामुळे कमी झाला. सरपंच महेंद्र  पवार, उपसरपंच अशोक कुंभार आणि शाखा अभियंता इंगळे यांचे याकामी चांगले सहकार्य मिळाले.
          सौरपंपामुळे ग्रामपंचायतीला दरमहा लागणाऱ्या अडीच ते तीन हजाराच्या वीज खर्चाची बचत झाली आहे. ऊर्जेची निश्चिती असल्याने गरजेनुसार आणि नियोजित पाणीपुरवठा करण्यात येतो. सौरपंप सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सौरपंपाची देखभाल आणि दुरुस्ती पाच वर्षासाठी पुरवठादार करणार आहे. एकंदरीतच ही योजना महिलांसाठी विशेष अशीच ठरली आहे.
-----


          

            

No comments:

Post a Comment