Friday 27 October 2017

राष्ट्रीय एकता दौड

राष्ट्रीय एकता दौडमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे-महेश झगडे

      नाशिक, दि. 27 :-  'राष्ट्रीय एकता दिवस' व 'राष्ट्रीय संकल्प दिवस' उत्साहाने साजरा  करण्यासाठी  31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आदी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज केले.
          नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात   सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने  'राष्ट्रीय एकता दिवस' तसेच     स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी  निमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिवस' कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आयोजित  बैठकीत ते बोलत होते.  यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपायुक्त  रघुनाथ गावडे, उपायुक्त प्रकाश वाघमोडे, उपायुक्त प्रवीण  पुरी, नाशिक शहर मुख्यालय पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे,  निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,   जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक आदी  उपस्थित होते. 

        श्री. झगडे म्हणाले, विभागातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी व महत्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ, राष्ट्रीय एकता दौड व सायंकाळी संचलन, मानवंदना आदींचे नियोजन करण्यात यावे.   राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात  मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-00 वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  'राष्ट्रीय एकता दिवसा'ची शपथ घ्यावी.
           राष्ट्रीय एकोपा वाढीस लागावी या उद्देशाने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन, देशभक्तीपर गाणी व नामवंत वक्त्यांची व्याख्याने आदी  आयोजित करण्यात यावीत.   जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवसाची माहिती  पोहचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. 
          यावेळी विभाग प्रमुखांनी  'राष्ट्रीय एकता दिवस' व 'राष्ट्रीय संकल्प दिवसा'निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. 

नाशिक शहरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन
          मंगळवार 31 ऑक्टोबर, 2017 रोजी सकाळी 7-00 वाजता श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून  राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ होणार आहे.  श्री छत्रपती शिवाजी  स्टेडियम   त्र्यंबक नाका मार्गे, गोल्फ क्लब मैदान येथे दौडचा समारोप होईल, अशी माहिती श्री. रविंद्र नाईक यांनी  दिली. 
राष्ट्रीय एकता दौड मध्ये सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक यांचे अधिनस्त असलेले विद्यार्थी,  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व इतर खेळाडू तसेच सेवाभावी संस्था,  700 स्काऊट, गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार  आहेत.   सायंकाळी  पोलीसांचे संचलन आयोजन  करण्यात येणार  आहे. 
-0000000

No comments:

Post a Comment