Monday 30 October 2017

निमा कार्यक्रम

विकासासाठी लहान उद्योगही महत्वाचे-अनंत गिते

नाशिक, दि.30 :  कृषी आणि उद्योग क्षेत्रांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असून  देशाच्या विकासासाठी मोठ्या उद्योगाएवढेच लहान उद्योगही महत्वाचे आहेत,  असे प्रतिपादन केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सार्वजनिक उद्योगांचे प्रतिनिधी, उद्योग, व्यवसाय आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. गिते म्हणाले, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायतत्ता दिली आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्या तीन वर्षापूर्वी 14 हजार कोटी रुपये तोट्यात होत्या. त्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज नफ्यात आल्या आहेत. निमाच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग जवळ येण्यास सुरुवात झाली असून हे संबंध जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला पूरक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,  एक नवीन उद्योग उभारला गेल्यास त्यामुळे शेकडो- हजारो जणांना रोजगार उपलब्ध होतो. उद्योगांसाठी अधिकाधिक व्हेंडर नोंदणी होणे चांगले असून त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्याचा परिणाम गुणात्मक वाढ होण्यावर होईल. यासाठी नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जावे, अशी अपेक्षा श्री.गिते यांनी व्यक्त केली.

‘मेक इन नाशिक’ उपक्रमामुळे नाशिक येथील औद्योगिक गुंतवणूकीसाठी उपयोगी वातावरण तयार होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाशिक येथील रस्ते, रेल्वे व विमान मार्गांची कनेक्टिव्हिटी उद्योगांना पोषक असून लवकरच येथून विमानसेवा सुरु होईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी खा.गोडसे, निमाचे अध्यक्ष श्री. पाटणकर आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., भारत इलेक्ट्रिकल लि., गोवा शिपयार्ड लि., मिश्र धातू लि. , माझगाव डॉकयार्ड लि. आदी सार्वजनिक उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मंत्री महोदयाच्या हस्ते सन्मान करण्यात आला.                                    
                                                        *******


No comments:

Post a Comment