Tuesday 11 September 2018

शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर


धानोरे गावात कांदा चाळीमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात  भर

       नाशिक, दि.11- निफाड तालुक्यातील धानोरे गावात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योनजेअंतर्गत कांदा चाळीसाठी  अनुदान देण्यात आल्याने वसंत गुजर यांचे गतवर्षी झालेले नुकसान भरून निघण्यास मदत झाली आहे. त्यांनी कांदा चाळ उभारून उत्पन्नही वाढविले आहे.
कांदा पीक घेताना दराची अनिश्चितता  आणि साठवणीची समस्या अशा दूहेरी पेचात शेतकरी असतात. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कांदा चाळीमुळे  या दोन्ही समस्यांवर मात करणे शक्य झाले आहे.
गुजर हे पाच एकर क्षेत्रात द्राक्षे व मक्याचे पीक घेतल्यानंतर कांद पीक घेतात. कांदा साठवण करण्याची सुविधा नसल्याने प्रत्येक वर्षी काही प्रमाणात नुकसान होते. गेल्यावर्षी हे प्रमाण अधिक होते. पावसापासून कांद्याचे संरक्षण करता न आल्याने दरही कमी मिळाला आणि बराच कांदा खराब झाला.

कृषी विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कांदाचाळीसाठी अनुदान घेतले. 87 हजार 500 रुपये अनुदान मिळालनंतर त्यांनी कांदाचाळ उभारली आहे. 42 फूट बाय 22 फूट आकाराच्या या चाळीची क्षमता 25 मे.टन एवढी आहे. आजही चाळ कांद्याने भरली आहे. दर अधिक असताना कांदा बाजारात नेणे शक्य असल्याने झालेले नुकसान भरून काढणे गुजर यांना  शक्य झाले आहे.
धानारे गावात यावर्षी 12 शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान देण्यात आले. कांदाचाळी उभ्या रहात असल्याने कांद्याची साठवण करणे शक्य झाले आहे. परिणामत: कांद्याला चांगले दर मिळाल्यानंतर माल बाजारात नेणे  शेतकऱ्याला शक्य होत आहे. अर्थातच त्यामुळे शेतकरी समाधानी असून त्यांच्या उत्पन्नात भर पडते आहे.
वसंत गुजर- कांदा मार्चमध्ये काढल्यावर चाळीमुळे ऑक्टोबरपर्यंत ठेवता येणे शक्य  होणार आहे. त्यामुळे बाजाराची स्थिती पाहून माल विकता येईल आणि चांगला दरही पदरात पडेल. विशेष म्हणजे होणारे नुकसान यामुळे वाचणार आहे. शेतीसाठी चांगले भांडवल तयार होईल अशी आशा आहे.

-----

No comments:

Post a Comment