Saturday 8 September 2018

लोकराज्य वाचक मेळावा


कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रगती शक्य-संपत चाटे

 नाशिक, दि.8- युवकांना स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असून त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त केल्यास वेगाने प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय नाशिक लोकनेते व्यंकटराव हिरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात  ते बोलत होते. यावेळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, डॉ. एन बी पवार,   डॉ. अरुण पाटील, रंगोजी पाटील, डॉ.किरण पिंगळे, अस्तित्व अकादमीचे हर्षल कोठावदे, लखन अग्रवाल आदी उपस्थित होते.

श्री. चाटे म्हणाले, युनेस्कोने यावर्षी साक्षरता दिनासाठी साक्षरता कौशल्य विकास  ही संकल्पना निश्चित केली आहे. भारतासारख्या तरुणांची संख्या अधिक असलेल्या देशाच्यादृष्टीने शिक्षणाची सांगड कौशल्य विकासाशी घालणे गरजेचे आहे. ज्ञान आणि कौशल्याद्वारे रोजगाराची संधी सहजपणे प्राप्त होते.  पारंपारिक शिक्षणाबरोबर संवाद  आणि जीवन कौशल्याचा अभ्यासही गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील अनेक देशाना भविष्यात कौशल्य असलेल्या तरुण मनुष्यबळाची गरज भासणार असून ती भारतासाठी मोठी संधी असेल, असेही ते म्हणले.  

प्राचार्य डॉ. जगदाळे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक माहिती लोकराज्यच्या माध्यमातून मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तसेच माहितीचा स्त्रोत म्हणून लोकराज्यला संदर्भ पुस्तिकेचे महत्व आहे.  शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकराज्य मासिक उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचा वार्षिक अंक शासकीय योजनांची माहिती देणारा असेल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

श्री.कोठावदे म्हणाले, महाविद्यायीन जीवनात कौशल्य, संधी आणि अभिरुची याविषयी जाणून घेतल्यास आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी होता येते. स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी महाविद्यायीन जीवनापासून लोकराज्य मासिक संग्रही ठेवावे व त्याचे नियमित वाचन करावे, असे त्यांनी सांगितले.
डॉ.मोघे यांनी यावेळी लोकराज्य वाचक अभियान व माहितीदूत उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्यासाठी युवा माहिती दूत उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
-----

No comments:

Post a Comment