Monday 10 September 2018

डीफेन्स इनोव्हेशन हब


डीफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच होणार-डॉ.सुभाष भामरे

नाशिक दि.10- डीफेन्स इनोव्हेशन हब [ Defence Innovation Hub] नाशिकलाच होणार असून त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला सुरवात  एका महिन्यातच होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.
तीन महिन्यापूर्वी डॉ.सुभाष भामरे यांनी डीफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला होणार अशी माहिती दिली होती. त्यानंतर कार्यक्रम घेऊन अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र निवडणूक आचारसंहीतेमुळे सदर कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे मधील काळात सदर केंद्र नागपूरला जाण्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र तसा कोणताही प्रकार नसून संरक्षण मंत्रालय नाशिकला सदर इनोव्हेशन हब सुरू करण्याच्यादिशेने काम करीत आहे, असे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात लघुउद्योजकांना संरक्षण क्षेत्रातून
  प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या माध्यमातून 'डीफेन्स इको सिस्टीम' तयार व्हावी यासाठी भारत सरकारने डीफेन्स इनोव्हेशन हब विविध ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  सहा महिन्यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या 'डीफेन्स एक्स्पो' मध्ये केरळ राज्यातील कोईम्बतूर येथे डीफेन्स इनोव्हेशन हब देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. 
या माध्यामातून संरक्षण क्षेत्रात लघुउद्योजक, संरक्षण उद्योग, इनोव्हेटर्स, स्टार्ट अप,अकॅडमी यांना संशोधन आणि विकासासाठी प्रस्तावित करायचे व त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, तसेच त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून द्यायचा अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
डॉ.भामरे यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी आणि  संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांचेकडे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकला करण्याबाबत आग्रह धरला होता.  प्रधानमंत्री महोदय, संरक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सदर हब नाशिकला स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही दिवसापूर्वी सदर हब नागपूरला होत असल्याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेत काहीही तथ्य नसून एका महिन्यात नाशिकला डिफेन्स इनोव्हेशन हबची रितसर घोषणा होईल, असे डॉ.भामरे यांनी स्पष्ट केले आहे. 
तसेच आर्मी कॉम्बॅक्ट एव्हीएशन ट्रेनिंग युनिट  नाशिक येथून हलविण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
----

No comments:

Post a Comment