Friday 7 September 2018

उद्योजकता प्रशिक्षण


प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योजकतेकडे वळा-दिलीप स्वामी

       नाशिक दि. 7 :- उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी जीवन जगण्याचे समाधान मिळत असल्याने युवकांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले.
           महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे देवळालीतील लेस्ली शॅानी सेंटर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आयोजित निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्योग सहसंचालक प्रवीण देशमुख, देना बँकेचे विभागीय व्यवस्थापक मृणाल हालदार, निमाचे कैलास आहेर, विभागीय अधिकारी जी.पी. पलसोदकर, उमेश दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.
          श्री.स्वामी म्हणाले, उद्योग करण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. आपल्या भागातील नागरिकांच्या गरजा ओळखून तसेच येणाऱ्या काळातील वस्तू आणि सेवेची मागणी लक्षात घेऊन उद्योगाकडे वळल्यास हमखास यश मिळते. मनातील भिती आणि न्यूनगंड बाजूला सारल्यास सर्व अडचणींवर मात करून  यशस्वी उद्योजक होणे शक्य आहे. त्यासाठी कौशल्य विकासही महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

          नाविन्याचा शोध घेतल्यास उद्योग क्षेत्रात पाय रोवून उभे राहणे शक्य असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचा व्यापक कार्यक्रम सुरू करण्यात आल्याच ते म्हणाले.
          श्री.आहेर यांनी वेळ, उद्योग करताना गुणवत्ता आणि दर या तीन घटकांकडे लक्ष देणे  आवश्यक असल्याचे सांगितले. तर श्री.हालदार यांनी उद्योगाचा प्राधान्यक्रम निवडून तो यशस्वी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन केले.
          प्रास्ताविकात श्री.पलसोदकर यांनी नाशिकमध्ये अनुसूचित जातीच्या युवकांसाठी मेळाव्याचे आयोजन करून 40 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आल्याचे सांगितले. 18 दिवसात उद्योगाशी निगडीत विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
                                                       ---       


No comments:

Post a Comment