Saturday 15 September 2018

वसतीगृह पाहणी


वसतिगृहात चांगल्या दर्जाच्या सुविधा देणार-गिरी महाजन


                नाशिक, 15 : डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मेरी परीसरात नुतनीकरण करण्यात आलेल्या नियोजित वसतीगृह इमारतीत उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
                वसतीगृहाच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सिमा हिरे, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रणजित हांडे, मेरीचे मुख्य अभियंता दिलीप जोशी, अधिक्षक अभियंता राजीव मुंदडा,अ.ल.पाठक आदी उपस्थित होते.

                श्री.महाजन म्हणाले,  दोन्ही इमारतीत 120 विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. अशाचप्रकारे स्वतंत्र दोन इमारतीत 120 विद्यार्थीनींची सुविधा लवकरच करण्यात येणार आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून स्वतंत्र जागेवर वसतीगृहीची सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रीया वर्षभरात पुर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
                वसतीगृहासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेशासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्वरीत वसतीगृह सुरू करण्यात येईल. कमीत कमी वेळेत ही प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

                पालकमंत्री महाजन यांनी वसतीगृहाची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. इमारतीतील सुविधांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
              डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वासतिगृहासाठी नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात 'मेरी' येथील  दोन इमारती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश यापूर्वी पालकमंत्री महाजन यांनी दिले होते. त्यानुसार इमारत हस्तांतरीत करण्यात आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने काम करीत इमारतींचे नुतनीकरण पुर्ण केले आहे.

पालकमंत्र्यांकडून शिंदे कुटुंबियांचे सांत्वन

          पालकमंत्री श्री.महाजन यांनी बेळगाव ढगा येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गुरुवारी या कुटुंबातील चार महिला सदस्यांचा शिवारात असलेल्या बंधाऱ्यात बुडुन मृत्यु झाला होता. झालेली घटना दु:खद असल्याचे श्री.महाजन यावेळी म्हणाले. गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत तातडीने बैठक घेऊन माहिती देण्याचे निर्देश श्री.महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
-----

No comments:

Post a Comment