Wednesday 19 September 2018

रुरबन मिशन बैठक


दाभाडी क्लस्टर विकासात नव्या संकल्पना राबवा-दादाजी भुसे

नाशिक, 19 : दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यलयात रुरबन मिशन अंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
श्री.भुसे म्हणाले, दाभाडी क्लस्टर अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजनांचा आराखडा आठ दिवसात सादर करण्यात यावा. पर्यावरणपूरक शौचालयाचे मॉडेल अभ्यासून त्यानुसार शौचालयांचे युनिट उभारण्यात यावे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी  रस्त्यांची सर्व कामे नियोजित वेळेत होतील याची दक्षता घ्यावी.

क्लस्टरमधील पथदिवे नसलेल्या गावांचा समावेश रुरबन योजनेअंतर्गत करण्यात यावा. कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे गांभिर्याने लक्ष देण्यात यावे. ठिबक सिंचनासाठी अधिकाधीक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. क्लस्टर विकसीत करताना पुढील पिढीला उपयुक्त अशी कामे करावीत. निधीचा दुरूपयोग झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 ग्रामपंचायतींचे नवे कार्यालय उभारण्याबाबतचे प्रस्ताव त्वरीत सादर करण्याचे आदेश त्यांनी ग्रामसेवकांना दिले. ग्रामसेवकांनी  मिशन अंतर्गत कामांचा प्राधान्याने पाठपुरावा करावा व कामे वेळेत होण्याच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असेही श्री.भुसे म्हणाले.

श्री.गिते यांनी सर्व यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने कामांचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. आयआयटी सल्लागार नेमून चांगल्या दर्जाची कामे होतील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. बैठकीत दाभाडी क्लस्टर अंतर्गत गावात राबविण्यत येणाऱ्या पाणी पुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, कृषी ‍विकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकूल योजना आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment