Wednesday 19 September 2018

आढावा बैठक


ग्रामीण भागात अतिक्रमीत जागेवर घरकुल-दादाजी भुसे



नाशिक दि.19 - सर्वांसाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरकुल उपलब्ध होण्यासाठी गायरान, सार्वजनिक वापरातील जमिनी, वनक्षेत्र तसेच जेथे वास्तव्य करणे शक्‍य नाही अशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या अतिक्रमीत जागेवर घरकुल बांधण्यासाठी आवश्यक पुरावे बघून मंजुरी देण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
          जिल्हा परिषद येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे,  आमदार अनिल कदम, योगेश घोलप, नरेंद्र दराडे, दिपीका चव्हाण, उपाध्यक्ष नयना गावित  ग्रामविकास विभागाचे  उपसचिव प्रकाश वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, उपायुक्त सुकदेव बनकर, उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, 2022 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम केंद्र व राज्याने हाती घेतली आहे. गायरान जमिनीवर घरासाठी जागा उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांनी बांधलेली अतिक्रमीत घरकुले काढली योग्य नसल्याने  ग्रामीण लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2011 पूर्वीची अतिक्रमीत जागा निवासासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. गरजुंना घरे मिळावी त्यासाठी अधिकाऱ्यांनी घरकुल योजनांची अंमलबजावणी तातडीने करावी असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी श्री. भुसे यांनी आपले सरकार सेवा केंद्र, अस्मिता योजना, जिल्हा भौतिक प्रगती, जिल्हा हागणदारीमुक्त सद्यस्थिती, मुलभुत सुविधेची मागणी, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पशुसंवर्धन, अपंग कल्याण योजना आदी विविध विषयांचा आढावा घेतला.

          प्रधानमंत्री आवास योजनेत नाशिक जिल्हा कामगिरीत प्रथम क्रमांकावर असल्याने श्रीमती सांगळे यांनी समाधान व्यक्त केले.
            यावेळी सन 2017-18 या कालावधीत उत्कृष्ट कामकाज करणारे आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांना मंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले. बैठकीस जिल्ह्यातील सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
          ---     

No comments:

Post a Comment