Saturday 8 September 2018

हक्काचे घरकूल


हक्काचे घरकूल देण्यात कळवण राज्यात अग्रेसर

       नाशिक दि.8- कळवण तालुक्याने विविध घरकूल योजनेअंतर्गत अनेक गरजूंना हक्काचे घरकूल उपलब्ध करून दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी  नरेश  गिते यांचे मार्गदर्शन, डोंगरसिंग बहिरमसारख्या संवेदनशील अधिकाऱ्याचे प्रयत्न, विविध विभगातील समन्वय आणि लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांची मिळालेली साथ यामुळे घरकूल योजनेत तालुका राज्यात  अग्रेसर आहे.
          तालुक्यातील अधिकाधीक नागरिकांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी बहिरम यांनी आठवडे बाजाराच्याठिकाणी जावून नागरिकांच्या बैठका घेतल्या. त्यांना योजनांची सविस्तर माहिती देताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लाभार्थी नोंदणी प्रक्रीया आणि जिओ टॅगींगची प्रक्रीया वेगाने करण्यासाठी त्यांना गृहनिर्माण अभियंता अमित मुळे आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर महेंद्र देवरे यांचे सहकार्य लाभले.

          घर बांधतांना प्रमुख अडचण वाळूच्या उपलब्धतेची होती. उपविभागीय अधिकारी अमिन मित्तल यांच्या सहकार्याने ही समस्या दूर करण्यात आली. गवंडी प्रशिक्षण घेण्यात येऊन घरांचा दर्जा चांगला राहील याकडेही लक्ष देण्यात आले.
          घरबांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांमार्फत पाहणी करून नियमानुसार दिले जाणारे अनुदान तात्काळ लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात आल्याने घरबांधणीचा वेग वाढला. पुढच्या टप्प्याचे बांधकाम थांबू नये यासाठी दुकानदाराकडून बांधकाम साहित्य उपलब्ध करून देताना रकमेची हमी पंचायत समितीने घेतली. साहित्याची निवड व दरनिश्चितीचे पुर्ण स्वातंत्र्य लाभार्थ्याला देण्यात आले.
          लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याने घरबांधणीच्या कामासाठी त्यांना मनरेगा अंतर्गत 20 हजार रुपयापर्यंतची मजूरी देण्यात आली. त्यामुळे त्यांना घरबांधणीकडे लक्ष देण्याबरोबरच रोजगाराची त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांनी कष्टाने मिळविलेला थोडा आणखी पैसा टाकून घरकूल चांगल्याप्रकारे सजविले.

          कळवण तालुक्याने कामगिरीच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या गुणांपैकी 97.31 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम  तर देशात 266 वा क्रमांक प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात 2 हजार 781 घरकूलांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले. त्यापैकी  2 हजार 779 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला असून 2 हजार 115 घरकूलांचे काम पुर्ण झाले आहे.
          शबरी घरकूल योजनेअंतर्गतदेखील 2016-17 मध्ये 314 घरकूल पुर्ण झाले. रमाई आवास योजनेत यावर्षी 44 लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले, तर 2017-18 मध्ये 71 घरकूलांना मंजूरी देण्यात आली.
          ग्रामीण आदिवासी भागात घरकूल योजनेमुळे पक्की घरे उभी रहात आहे. नागरिकांच्या अनेक समस्या त्यामुळे दूर झाल्या असून पावसाळ्यात त्याचा विशेष फायदा झाला आहे.
सुक्राबाई पवार, चणकापूर-आधी पडक्या घरात रहात असल्याने चिंता वाटायची. आता हक्काचे चांगल घर मिळाले आहे. शासनाने अनुदान दिल्यानेच हे शक्य झाले. शासनाला धन्यवाद द्यावेच लागेल. नाहीतर माझे घराचे स्वप्न पुर्ण झालेच नसते. आज घरात सर्व सुविधा आहेत.


डॉ.नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी- मुख्यमंत्री महोदयांचे प्रत्येला घरकूल देण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे. घरबांधणी वेगाने व्हावी यासाठी 5500 जणांना गवंडी प्रशिक्षण जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येत आहे.


----

No comments:

Post a Comment