Sunday 11 December 2016

के.व्ही.एन. नाईक कबड्डी प्रिमीयर लीग स्पर्धा उद्घाटन

शिवशाही चषक कबड्डी स्पर्धा नाशिकला घेणार-गिरीष महाजन

       नाशिक दि.11 :- क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडाप्रेमी नागरिकांना दर्जेदार खेळ पाहावयास मिळण्याबरोबरच गुणवान खेळाडुंना संधी मिळत असल्याने जिल्ह्यात कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिवशाही चषक कबड्डी स्पर्धा नाशिकला घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

नाशिक महानगरपालिका आणि क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित के.व्ही.एन. नाईक कबड्डी प्रिमीयर लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती सय्यद शेख, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कबड्डी संघटनेचे आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले,कबड्डी खेळामुळे चांगला व्यायाम होतो. तसेच हा खेळ आरोग्याला पोषक आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून मातीत खेळल्या जाणाऱ्या या खेळाच्या तंत्रात बरेच बदल झाले आहेत. खेळाच्या विकासासाठी अनेक प्रायोजक पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे. कबड्डी प्रिमीअर लीगच्या माध्यमातून चांगला खेळ क्रीडारसिकांना पाहावयास मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कबड्डी हा खेळ मॅटवर खेळला जात असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक मॅट उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. महाजन यांनी सांगितले.

श्री.मुर्तडक यांनी अलिकडल्या काळात क्रीडा स्पर्धांसाठी चांगल्या सुविधा मिळत असल्याचे नमूद करून अशा क्रीडा स्पर्धांमुळे जिल्ह्याच्या क्रीडावैभवात भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेचे सरचिटणीस  हेमंतराव धात्रक यांनी प्रास्ताविकात स्पर्धेत 72 खेळाडू सहभागी होत असून एकूण 19 सामने होणार असल्याची माहिती दिली.

राष्ट्रीय खेळाडू प्रणव अहिरे यांनी खेळाडुंना शपथ दिली. पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते शिवछत्रपती आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार विजेत्या कबड्डी खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. शानदार नृत्याने स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      

                                                          ----

No comments:

Post a Comment