Wednesday 14 December 2016

कॅशलेस व्यवहार

कॅशलेस व्यवहार शिका व शिकवा-रामदास खेडकर

          नाशिक दि.14 :- येत्या काळात दैनंदिन व्यवहारांसाठी ई-बँकींग किंवा मोबाईल बँकींगचा वापर अधिक प्रमाणात होणार असल्याने महाई-सेवेच्या प्रतिनिधींनी कॅशलेस व्यवहाराविषयी माहिती घेऊन ती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महाई-सेवा व सीएससीच्या प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) शशीकांत मंगरुळे  , तहसिलदार सी.एस.देशमुख, सीएससीचे स्टेट हेड समीर पाटील, चेतन सोंजे आदी उपस्थित होते.

          खेडकर म्हणाले, कॅशलेस व्यवहारामुळे पैसा सुरक्षित रहातो, तसेच व्यवहारातील अनेक अडचणी टाळता येतात. जगातील अनेक देशात ही प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरली जात असून केंद्र सरकारनेदेखील कॅशलेस प्रणालीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.  केंद्र कॅशलेस व्यवहाराला चालना देण्याच्या उद्देशाने व्यवहार पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याने महाई-सेवा केंद्रांनी या प्रणालीचा प्रचार व प्रसार करावा, असे त्यांनी सांगितले.
          यावेळी श्री.सोंजे यांनी विविध मोबाईल ॲपचा कॅशलेस व्यवहारांसाठी उपयोग  करण्याबाबत माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी ई-बँकींग आणि मोबाईल बँकींगचा उपयोग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली.

          कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व महाई-सेवा केंद्र व सीएससीचे प्रतिनिधी व ऑपरेटर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment