Saturday 24 December 2016

राष्ट्रीय ग्राहक दिन

ग्राहकांनी अधिकारांची माहिती करून घ्यावी-मिलींद सोनवणे

          नाशिक दि.24 :- ग्राहकांनी आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी अधिकारांबाबत आणि ग्राहक कायद्याबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलींद सोनवणे यांनी केले.

          तहसील कार्यालय नाशिक येथे आयोजित ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्या प्रेरणा काळोखे, तहसीलदार राजश्री अहिरराव, जिल्हा ग्राहक दक्षता समितीचे अध्यक्ष सुधीर काटकर, धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले आदी उपस्थित होते.

          श्री.सोनवणे म्हणाले, ग्राहक सक्षम असल्यास देशाची प्रगती वेगाने होते. ग्राहकाचे शोषण होत नसल्यास अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी ग्राहक हक्कांचे रक्षण आवश्यक आहे. ग्राहकांनीदेखील वस्तूची खरेदी करताना किंवा सेवा घेताना त्याबाबतची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रीयेची माहिती त्यांनी दिली.

          श्रीमती नरके यांनी ग्राहकाला हक्कांची जाणीव होणे हे प्रगत समाजाचे लक्षण असल्याने ग्राहक जागृती महत्वाची असल्याचे सांगितले.

          यावेळी ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व, चित्रकला, निबंध आणि वादविवाद स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. बीआरडी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ‘ग्राहक राजा जागा हो’ या पथनाट्याद्वारे ग्राहकजागृतीचा संदेश दिला.
          याप्रसंगी आयोजित प्रदर्शनात गॅस कंपन्या, बीएसएनएल, अन्न व नागरी पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासन, नागरी सुविधा केंद्र आदींनी माहिती देणारे स्टॉल्स उभारले होते. श्रीमती काळोखे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले.

          ----

No comments:

Post a Comment