Saturday 24 December 2016

नाशिक स्पोर्ट्स फेस्टिव्हल

                                स्पोर्ट्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून नाशिक हेल्थ कॅपिटल व्हावे
                                                                                                       -डॉ.रविंद्र सिंगल

 नाशिक, दि. 24- उत्तम आरोग्यासाठी जीवनात खेळ हा महत्वाचा घटक असून जिल्हा प्रशासनाच्या व दै.लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नाशिक स्पोर्टस् व ॲडव्हेंचर फेस्टीव्हलच्या माध्यमातून नाशिक हे हेल्थ कॅपिटल व्हावे, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केली.

गोल्फ क्लब मैदानावर स्पोर्टस् व ॲडव्हेंचर फेस्टीव्हल अंतर्गत आयोजित सायकल रेस व जॉय रायडिंगच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, लोकमतचे उपाध्यक्ष व्ही.बी.चांडक, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय सबनीस, अशोका बिल्डकॉनचे अशिष कटारिया, किरण चव्हाण, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री.सिंगल म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणसांना व्यायाम व खेळण्यासाठी थोडा वेळ काढायला हवा. खेळण्याने प्रत्येक व्यक्तीचे शारिरीक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होत असून शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गोल्फ मैदान ,मायको सर्कल, एबीबी सर्कल, पपयाज नर्सरीमार्ग, त्र्यंबकेश्वर, अंबोली घाट मार्गे परत गोल्फ क्लब मैदान  अशा 70 किलोमीटर सायकल रेससाठी 18 ते 40 महिला वयोगट, 18 ते 40 पुरुष, 40 व त्यापुढील महिला व पुरुष व सिव्हील सर्व्हीसेस असे एकूण पाच गट करण्यात आले होते.

सायकलिंगची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी जॉय राइड घेण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील टोंगळाबाद गावातील जय बजरंग व्यायाम शाळेतील मुला-मुलींनी  सायकल मल्लखांबद्वारे विविध कसरतींचे सादरीकरण केले.
**********




No comments:

Post a Comment