Friday 30 December 2016

वनराई बहरली

सामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली

          कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे अनेक उपाय केल्याने परिसरातील 400 हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे. वनस्पतींच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती इथे असून गावाला या वनाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. गावाने संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

          इन्सीच्या दाट जंगलात सुर्यकिरणांनादेखील प्रवेश कठीण असतो. विशेष म्हणजे जंगलात फिरताना एकही झाड तोडलेले दिसत नाही.  ग्रामस्थांच्या गेल्या 17 वर्षाच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. ग्रामस्थांनी स्वत:हून अवैध चराईस आणि वृक्षतोडीस प्रतिबंध केला आहे. समितीचे सदस्य दोन-तीन व्यक्तींच्या गटात गस्त घालून जंगलाचे रक्षण करतात. ग्रामपंचायतीने दोन रखवालदारांची नेमणूक केली असून त्यांच्या मानधनासाठी प्रत्येक कुटुंबाकडून ठरल्याप्रमाणे निधी गोळा केला जातो.

          वणवा लागू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. जंगलात आगपेटी घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. वनक्षेत्रात अतिक्रमण करण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आढळल्यास समितीचे सदस्य वनविभागाला तात्काळ माहिती देतात. अवैध चराईस पुर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे गवत कापून आणण्यास ग्रामस्थांना परवानगी असल्याने चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

          जंगलात वन्यजिवांच्या शिकारीसदेखील बंदी करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. त्यामुळे इथे मोर, ससे, घोरपड, कोल्हे, लांडगे, बिबट आदी प्राणी-पक्षी आढळतात. जंगलात नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. त्याखेरीज विविध ठिकाणी चार वनतळे घेण्यात आली आहे. पावसाळ्यात बंधारे बांधून पाणी अडविले जाते. वृक्षांचा पालापाचोळा जंगलातच राहत असल्याने बाष्पीभवन कमी होण्याबरोबर जमिनीचा पोतही चांगला राहण्यास मदत होत आहे. वनराईमुळे जमिनीची धूप थांबून शेतातील मृदेचे रक्षण होण्यास मदत झाली आहे.

          वन परिक्षेत्र अधिकारी बी.आरा.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ग्रामस्थांशी चांगला समन्वय राखला असून गावात 32 कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. इतरही कुटुंबांना गॅस शेगडी वाटप करण्यात येणार आहे. गावात सभामंडप बांधून देण्यात आला आहे. गावातील धार्मिक कामांसाठी हा मंडप भाड्याने दिला जातो. त्यातून मिळणारा निधी समितीच्या खाजगी खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांना दहा आंब्याची आणि एक लिंबाचे कलम शेतात लावण्यासाठी वाटप करण्यात आले आहे.

गावातील महिलांचे वन संरक्षणासाठी सहकार्य घेण्यात वन विभगाला यश आले आहे. महिलांना वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकारी मंडळात 50 टक्के सहभाग देण्यात आला आहे. महिलावर्ग जागरूक असल्याने इंधनाची गरज भागविण्यासाठी धसकट, मक्याचे वाया जाणारे लेंडरे, शेणाच्या गवऱ्या आदीचा वापर करण्यात येतो.

इन्सी गावाला प्रवेश करण्यापूर्वी दिसणारे डोंगर आणि गावातील डोंगराचा भाग पाहिल्यावर ग्रामस्थांनी केलेले भरीव कार्य चटकन जाणवते. शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाला साजेशे आणि त्यासाठी इतरांना प्रेरणा देणारे कार्य या गावाने करून दाखविले आहे. विशेष म्हणजे त्यातील सातत्य तेवढेच कौतुकास्पद आहे.
रमेश  पवार-  वीस वर्षापूर्वी गावाभोवती उजाड माळरान होते. आज 106 प्रकराच्या वनस्पतींच्या प्रजातींनी वन नटलेले वन आमच्या गावात असल्याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला आहे. त्यामुळे वनराई जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व ग्रामस्थ करतात.

शशीकांत वाघ, वन परिमंडळ अधिकारी- लोकामध्ये जंगलाबद्दल चांगली भावना रुजावी आणि जंगलापासून होणारे फायदे त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी वनविभागातर्फे विविध योजनांचा लाभ गावाला देण्यात आला आहे. वन संरक्षणाच्या कामात ग्रामस्थांचादेखील चांगला प्रतिसाद असतो.


No comments:

Post a Comment