Thursday 29 December 2016

महाराजस्व अभियान

महाराजस्व अभियानातील काम महत्वपूर्ण
-         राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.29 :- नाशिक तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण तसेच शहरी भागाची मोठी लोकसंख्या लक्षात घेता त्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यासह आधार कार्ड नोंदणीसाठी आयोजित महाराजस्व अभियानाचे काम जनतेच्यादृष्टीने महत्वपूर्ण आणि प्रशासनाची विश्वासार्हता वाढविणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.      
      नाशिक तहसिल कार्यालयातर्फे आयोजित महाराजस्व अभियान अंतर्गत भव्य शिबीराच्या व विस्तारित समाधान योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी गोकूळ वाघ, तहसिलदार राजश्री अहिरराव हे उपस्थित होते.

महाराजस्व अभियानाची 3 वर्षांपासून अंमलबजावणी होत असल्याचे सांगून श्री.राधाकृष्णन म्हणाले, नागरीकांची विविध दाखल्यांची मागणी मोठ्या संख्येने आहे. मंडळस्तरावर यापूर्वी झालेल्या शिबीरांमध्ये देखील विविध योजनांची माहिती देणे, विविध योजना, शिधापत्रिका दाखल्यांसाठी अर्ज स्विकारणे, लाभार्थ्यांना मंजूर लाभ दाखले देण्याचे काम झाले आहे. महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांसाठीचे विविध दाखले देण्यात आल्यास त्यांची शालेय  प्रवेशाच्या वेळी दाखल्यांसाठी होणारी गर्दी टाळता येऊ शकेल, असे ते म्हणाले.
नाशिक तहसिलने महाराजस्व अभियानाद्वारे डिजीटल पद्धतीने दाखले देण्यासाठी केलेल्या सुविधेमुळे वेळेची बचत होऊन मोठ्या लोकसंख्येला सेवा देणे शक्य झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कॅशलेस सेवांसाठी सर्वांनी सहभाग देण्याचे आणि 1 जानेवारी रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबीराचा लाभ गरजूंना होण्यासाठी त्याची माहिती जनतेपर्यंत  पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. शंभरकर म्हणाले, शासनाच्या योजना जनतेसाठी पोहोचवण्यासाठी  महाराजस्व अभियान चांगला उपक्रम आहे. ग्रामिण भागामध्ये अजूनही लोकांमध्ये चांगल्या आरोग्यासाठी हागणदारी मुक्त गाव (ओडीएफ) व्हावे यासाठी जागरुकता होण्याची गरज आहे. शौचालय बांधण्यासाठी शासन मदत करत असूनही काही ठिकाणी प्रथम शौचालयाचे अनुदान मागण्यात येते. त्यामुळे त्यांचे आरोग्य आर्थिक नुकसान होते आहे.  त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याची आणि जिल्हा पूर्णपणे हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तहसिलदार अहिरराव यांनी नाशिक तहसिल कार्यालयाने डिजीआयझेशनसाठी जवळपास 12 लाख 70 हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण केले असून  आधारकार्डचे देण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. आधार कार्डाचे बँक खात्याबरोबर सींडींग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, दाखले शिधापत्रिका वाटप करण्यात आले. महाराजस्व अभियान, डिजीटायझेशन प्रक्रिया विविध योजनांच्या अंमलबजावणी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
आमदार प्रा.देवयानी फरांदे सीमा हिरे यांची महाराजस्व अभियानाला भेट

आमदार प्रा.देवयानी फरांदे सीमा हिरे यांनी आज महाराजस्व अभियानाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध शासकिय विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली. अभियानासाठी महसूल, आरोग्य, कौल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन, कृषि, भारत पेट्रोलियम, महावितरण आदी विभागांनी स्टॉल्स उभारले होते.
तसेच उत्कृष्ठ कार्याबद्दल मंडल अधिकारी एम.एस. शेख, नायब तहसिलदार सुदेश कांबळे, तलाठी अनिल रोकडे, आर.एम.परबते, आनंद नगरे, भगवान साबळे यांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते विमल अहिरे भारती वर्मा यांना राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच 19 पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, उत्पन्न, जात, वय, अधिवास आदी प्रमाणपत्रे देण्यात आली.
महाराजस्व अभियानात विविध 2532 दाखले, प्रमाणपत्रे व मंजूरीपत्रांचे वाटप

अभियानात आज दिवसभरात महसूल विभागाच्या वतीने शालेय उपयोगाचे विविध 1800 प्रकारचे दाखले, 28 सामाजिक आर्थिक लाभाच्या योजनांची मुजूरी पत्रे देण्यात आली. तसेच 374 नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच 142 शिधापत्रिकेतील नावे कमी करण्याचे दाखले देण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने 128 द्राक्ष निर्यात नोंदणी प्रमाणपत्रे, 65 कृषि मृदु आरोग्यपत्रिका वाटप करण्यात आले. तसेच 320 विविध कृषि योजनांसाठी अर्ज स्विकारण्यात आले. याचबरोबर विविध विभागांनी शासकिय योजनांची परिपत्रके, माहिती पत्रे अभियानास भेट देणाऱ्या नागरीकांना वाटप केली.

0000000

No comments:

Post a Comment