Thursday 1 December 2016

एड्स दिन कार्यक्रम

एड्सला जनजागृतीद्वारे रोखा
जागतिक एड्स दिन कार्यक्रमात मान्यवरांचे आवाहन


नाशिक, दि.1:- एड्सपासून सतर्कता हाच उपाय असून एड्सवर नियंत्रणासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन एड्स दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात आज प्रमुख मान्यवरांनी केले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जागतिक एड्स दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, महापौर अशोक मुर्तडक, अपर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एस. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग प्रमुख योगेश परदेशी तसेच वैद्याकिय अधिकारी, परिचारीका, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी जि.. अध्यक्षा श्रीमती चुंभळे, महापौर मुर्तडक, अपर जिल्हाधिकारी श्री.बगाटे, डॉ. लोचना घोडके, डॉ.जगदाळे, डॉ.वाकचौरे  यांच्या सह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. एड्सला प्रतिबंधासाठी  यावेळी उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. ‘होऊ या सारे एकसंघ करु या एचआयव्हीचा प्रतिबंध’  हे या वर्षी एड्स दिनाचे घोष वाक्य असून एड्सवर उपचार ऐवजी त्यापासून सावधानता बाळगणे हाच पहिला उपाय असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमानंतर शहराच्या विविध भागातून मोठी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महाविद्यालय, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, भोसला मिलीटरी स्कूल, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, प्रवरा मेडीकल ट्रस्ट, समाजकार्य महाविद्यालय, मॅग्मो, विहान, मनमिलन व दिशा बहुउद्देशिय संस्था यासह विद्यार्थी, स्वयंसेवक व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात जिल्हा रुग्णालयापासून झाली. त्रंबक नाका, जिल्हा परिषद, कालिदास रंगमंदिर, रेडक्रॉस सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस मार्गे येऊन परत जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप झाला.

000000

No comments:

Post a Comment