Thursday 8 December 2016

मालेगांव शहर स्वच्छता अभियान

मालेगांव शहर स्वच्छता अभियानाला उर्त्स्फुत प्रतिसाद
दुपारपर्यंत 300 टन कचरा संकलीत

        मालेगाव. दि.8- जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मालेगांव शहर स्वच्छता अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागात सुमारे  पाच हजार नागरिकांनी शहर स्वच्छता उपक्रमात सहभाग घेत दुपारपर्यंत 300  टन कचरा संकलित केला.

          जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांचे हस्ते पोलिस कवायत मैदानावर स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी महापौर हाजी मोहम्म्द इब्राहीम, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त रवींद्र जगताप, अपर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, डॉ. रईस रिजवी, उपायुक्त रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, तहसिलदार डॉ.सुरेश कोळी आदी उपस्थित होते.

          यावेळी राधाकृष्णन् म्हणाले,  देशाच्या सर्वागिण विकासासाठी स्वचछता आणि आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची सवय लागणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियान एका दिवसापुरत मर्यादित न ठेवता आठवड्यात किमान दोन तास स्वच्छतेसाठी देण्यात यावे. घर स्वच्छ ठेवणे हा संस्काराचा भाग असतो त्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी इतरांना प्रोत्साहित केल्यास जिल्ह्यातून मालेगाव तालुका प्रथम हगणदारीमुक्त होण्याचा मान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          श्री.शंभरकर यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी नागरिकांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे व मालेगाव शहराचे अनुकरण इतर ठिकाणी होईल या उद्देशाने सर्वाना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.

          श्री. मुफ्ती यांनी  प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेचा निर्धार केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केल्याप्रमाणे  2019 पुर्वी देश स्वच्छ होणे शक्य आहे, असे सांगितले. स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी  नसून नागरिकांचा कर्तव्याचा भाग  आहे, असेही ते म्हणाले.
          श्री. रिझवी यांनी घर, शहर, राज्य आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

          प्रास्ताविकात श्री.स्वामी यांनी स्वच्छतेची निरंतर सवय लागावी यासाठी स्वच्छता अभियान आयोजित केल्याचे सांगितले. विद्यार्थीनीनी सक्रीय सहभाग घेतल्यास शहर हगणदारी मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          स्वच्छतेची शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला.

     ‘स्वच्छता दूत’ नावाची  टोपी  घातलेल्या तसेच विविध वेशभुषा केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनीनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पथनाट्या तील तुम्हाला कधी समजायचे हो’ हा संदेश सर्वांना भावला. सकाळपासून शहराच्या प्रत्येक रस्त्यावर स्वच्छतेचे साहित्य घेतलेले नागरिक आणि विद्यार्थी दिसत होते. उद्घाटनाच्यावेळी विद्याथी्र  रॅलीद्वारेआल्याने चांगली वातावरण निर्मिती झाली.
         
शहर स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले
          शहरातील विविध 25 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: श्रमदान करुन स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला. विविध शाळा, महाविद्यालय, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मोसम नदीपात्रात स्वच्छतेसाठी 12 जेसीबी मशिनचा उपयोग करण्यात आला. कचरा उचलण्यासाठी 42 ट्रॅक्टर्सची व्यवस्था करण्यात आली होती. नदीपात्रालगत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

          शाळा-महाविद्यालये, विविध संस्था, विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी, विविध तालुक्यांच्या तहसील, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, शिक्षक आदींनी या अभियानात सहभाग घेतला. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे 1200 विद्यार्थी अभियानात सहभागी झाले.

          प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली होती. विविध संस्था संघटनांतर्फे अभियानात सहभागी होणाऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शहरात अभियानाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होते. अभियानात सातत्य राहण्यासाठी नागरिकांनी  पुढाकार घेण्याच्या प्रतिक्रीयादेखील यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

**************

No comments:

Post a Comment