Thursday 29 December 2016

मोहमुख गाव हागणदारीमुक्त

मोलमजूरी करणाऱ्या फुनाबाईंमुळे मोहमुख गाव हागणदारीमुक्त


          नाशिक दि.-29-  मोलमजूरी करून उदर निर्वाह करणाऱ्या फुनाबाई पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कळवणतालुक्यातील मोहमुख गाव हागणदारीमुक्त झाले आहे. ग्रामस्थांच्या निश्चयामुळे केवळ तीन महिन्यात गावात 117 शौचालये उभारण्यात आली.
          कळवणपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी गावात 119 कुटुंबापैकी केवळ दोनच कुटुंबांनी शौचालय उभारले होते. ‘स्वच्छ भारतअभियानाचे प्रतिनिधी चेतन हिरे यांनी 10 ऑगस्ट 2015 रोजी ग्रामस्थांना शौचालय उभारण्याविषयी आवहन केले आणि स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. ग्रामसभेत याबाबत आवाहन केल्यानंतर  सर्वप्रथम फुनाबाई पुढे आल्या.

          आपल्या लहानशा झोपडीत मोलमजूरी करून एकट्या राहणाऱ्या फुनाबाईच्या पुढाकाराने ग्रामस्थांनाही प्रोत्साहन मिळाले. केवळ 100 रुपये दिवसाला कमविणारी महिला शौचालय बांधण्यासाठी पुढे येते ही ग्रामस्थांच्यादृष्टीने प्रेरक बाब ठरली. हळूहळू गावातील सर्व कुटुंबे शौचालय बांधण्यासाठी तयार झाली. सरपंच शिवदास साबळे, उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव आणि ग्रामसेवक सुनिल बस्ते यांनी ग्रामस्थांना तयार करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.

          गृहभेटी, गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शोषखड्डे उभारण्यासाठी ग्रामस्थांना सहकार्य केले. सायंकाळी गावकऱ्यांना एकत्रित करून हिवरेबाजार,राळेगणसिद्दी गावच्या यशकथा दाखविल्या जात असल्याने चांगली वातावरण निर्मिती झाली.

          पंचायत समितीच्या माध्यमातून 117 कुटुंबासाठी एकूण 14 लाख 4 हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. 10-10 शौचालयांच्या समुहाने काम टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात आले. गावातील तीन महिला बचत गटांचे सहकार्यही महत्वाचे ठरले. फुनाबाई नंतर बचत गटाच्या 50 हजाराच्या बचतीतून सुरुवातीचे काम बचत गटांनी सुरू केले. निधी प्राप्त झाल्यानंतर कामे वेगाने होऊन गाव हागणदारीमुक्त झाले.

          हागणदारीमुक्तीनंतर गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. आदिवासी भागातील स्वच्छतेविषयीचा हा निर्धार इतरांनाही  प्रेरक ठरला आहे, विशेषत: फुनाबाईंच्या निर्धाराचे सर्व गावाला कौतुक आहे.

फुनाबाई पवार- रात्री विंचू-काट्याचे डोंगराकडे जावे लागायचे. एकट्याने या वयात बाहेर जाणेही कठीणच होते. त्यामुळे घराजवळ शौचालय असावे असे वाटते. गाव स्वच्छ झाल्याचा आनंद आहे. यामुळे रोगराई दूर होईल


विजय जाधव- फुनाबाई पवार यांचा पुढाकार आणि महिला बचत गटांनी दाखविलेली तयारी यामुळे गावाला प्रोत्साहन मिळाले. ग्रामपंचायतीने फुनाबाईंना शबरी आवास योजनेतून घरकूल देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.हागणदारीमुक्तींनंतर आता सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष द्यावयाचे आहे.

No comments:

Post a Comment