Monday 5 December 2016

कॅशलेस व्यवहार

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहाराकडे वळावे-राधाकृष्णन बी.

          नाशिक दि.5 :- येत्या काळात दैनंदिन व्यवहारांसाठी ई-बँकींग किंवा मोबाईल बँकींगचा वापर अधिक प्रमाणात होणार असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत कॅशलेस व्यवहाराकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस व्यवहाराबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) शशीकांत मंगरुळे  आणि  स्टेट बँकेचे  व्यवस्थापक सुनिल खैरनार, सहाय्यक आशुतोष वर्मा आदी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी म्हणाले, कॅशलेस व्यवहारामुळे पैसा सुरक्षित रहातो, तसेच व्यवहारातील अनेक अडचणी टाळता येतात. अशा व्यवहारात सोपेपणा असून तंत्रज्ञानाची माहिती करून घेतल्यास याबाबतची भिती टाळता येईल. जगातील अनेक देशात ही प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरली जात असून केंद्र सरकारनेदेखील कॅशलेस प्रणालीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रणालीचा वापर करून किरकोळ विक्रेते आणि नागरिकांपर्यंत याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे, असेदेखील श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.

          यावेळी विविध मोबाईल ॲपचा कॅशलेस व्यवहारांसाठी उपयोग  करण्याबाबत माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. ई-बँकींग आणि मोबाईल बँकींगचा उपयोग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली.

----

No comments:

Post a Comment