Thursday 29 December 2016

महाआरोग्य शिबिर

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याची संधी
-         राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.29 :- पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाआरोग्य शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ डॉक्टरामार्फत गरजू व गरीब रुग्णांवर मोफत उपचार होणार असून ही सेवेची संधी समजून विविध यंत्रणांनी  शिबीर यशस्वी करण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाले, देशातील नामांकीत डॉक्टरांसह एकूण साडेचारशे डॉक्टर्स रुग्णांवर उपचार तसेच शस्त्रक्रीया करण्यासाठी शिबिरामध्ये उपलब्ध असतील. या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील एकही गंभीर आजाराचा रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एएनएम आदींच्या सहकार्याने प्रत्येक घरापर्यंत शिबिराची माहिती पोहोचवावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात विशेष तपासणी शिबिराचे येत्या दोन दिवसात आयोजन करून गरजू रुग्णांना शिबिरासाठी  पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या क्षेत्रातील रुग्ण बरा झाल्यास गरजूंची सेवा केल्याचे समाधान मिळेल, असे श्री.राधाकृष्णन म्हणाले.   आदिवासी  भागातील रुग्ण तपासणीसाठी रुग्णवाहिकांचा उपयोग करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
            श्री.शंभरकर यांनी आरोग्य तपासणी सप्ताहांतर्गत झालेल्या रुग्ण तपासणीचा आढावा घेतला. विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून  प्रत्येक गरजू रुग्णाला शिबिराचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
            श्री.नाईक यांनी शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर्स आपला महत्वाचा वेळ शिबिरासाठी देण्यास तयार असून त्याचा लाभ गरजूंना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
                                 शिबिराची तयारी अंतिम टप्प्याकडे

            महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांसह, वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना, खाजगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयात तपासणी करून शिबिरासाठी रुग्णांची नोंदणी करण्यात येत आहे
        टाटा ट्रस्ट, एम्पथी फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, कोनार्क फाऊंडेशन आदींसह विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य शिबिरासाठी मिळाले आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील आणि औषध विक्रेत्यांच्या सर्व संघटनादेखील शिबिरासाठी सहकार्य करीत आहेत. जिल्ह्यातील अशा स्वरुपाचे हे पहिलेच शिबीर असून यापूर्वी पालकमंत्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातूनलाख 48 हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
        गोल्फ क्लब मैदानावर शिबिराची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. मंडप उभारणीचे काम वेगाने करण्यात येणार असून या ठिकाणी विविध रोगांसाठी स्वतंत्र कक्षासह नोंदणी कक्ष, भोजन कक्ष, मदत कक्ष, रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध राहणार आहे. अनेक डॉक्टर्स आणि नागरिकांनीदेखील शिबीरासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

-----

No comments:

Post a Comment