Tuesday 20 December 2016

गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ

शिक्षकांमध्ये नवी पिढी घडविण्याचे सामर्थ्य -पालकमंत्री गिरीष महाजन
महानगरपालिका शिक्षण समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ संपन्न


नाशिक दि.20 :- ज्ञानदान आणि संस्काराच्या माध्यमातून नवी पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन राज्याचे  वैद्यकिय शिक्षण,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

कालिदास कलामंदिर येथे आयोजित महानगरपालिका शिक्षण समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण, उपसभापती गणेश चव्हाण, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, शिक्षकांचा पिढी घडविण्याच्या कामात मोलाचा वाटा आहे. पुरस्कार प्राप्त प्रत्येक शिक्षकाने या पुरस्काराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा घेवून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकी शिक्षणाबरोबर राष्ट्र प्रेम शिकवावे. त्याचबरोबर संस्कारक्षम विद्यार्थी घडविताना तो पुढच्या आयुष्यात कुठल्याही व्यसनापासून दूर राहील यासाठीदेखील प्रयत्न करावे,  असे ते यावेळी म्हणाले. शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

          श्री.मुर्तडक यांनी  पुरस्कार प्राप्त शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती मिळाली असून इतर शिक्षकांनीही त्यांचा आदर्श घेवून काम करावे, असे आवाहन करीत  देशातील तरुण घडविण्यामागे शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.

          यावेळी पालकमंत्र्यांच्या  हस्ते 42 शिक्षकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास यावेळी  सर्व शिक्षण समिती सदस्य तसेच अधिकारी पदाधिकारी, शिक्षक संघटना, समिती व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment