Friday 11 August 2017

वडझिरे ‘जलुयक्त’

वडझिरे शिवार ‘जलुयक्त’

सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात जलयुक्त शिवार योजना आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्याने 203 टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. गावातील साठ एकर पडीक जमीनीवर नाल्यातील आणि पाझर तलावातील काढलेला गाळ टाकल्याने त्याठिकाणी  शेतकऱ्यांनी पीक लागवड केली आहे.

वडझिरे गावाला पाणी पुरवठा नऊ गाव योजनेतून होतो. काहीवेळा उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके आणि सरपंच संजय नागरे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले. आमदार राजाभाऊ वाजे यांचेदेखील मोलाचे सहकार्य मिळाले. उपविभागीय अधिकारी महेश पाटील तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनदेखील गावाला लाभले. गतवर्षीच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या आराखड्यात गावाचा समावेश करण्यात आला.

निसर्गाने चांगले पर्जन्यमान देऊनही ते न अडविल्याने पाण्याचा योग्य उपयोग गावाला होत नव्हता. ग्रामस्थांची बैठक घेऊन पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवार फेरीत जलयुक्तचा आराखडा निश्चित करण्यात आला. साधारण एक कोटीचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात  लोकसहभागातून त्यापेक्षा जास्त काम करण्यात आले आहे.
‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत पाझर तलावातील 37 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. यासाठी जेसीबी शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध करून देण्यात आला. डिझेलसाठी तीन लाख 64  हजार रुपये अनुदान देण्यात आले. गाळ काढल्याने 37 टीसीएम पाणीसाठा वाढला. हा गाळ सहा हेक्टर क्षेत्रावर टाकल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

विविध यंत्रणामार्फत जलसंधारणाची कामे  करण्यात आल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.    लोकसहभागातूनदेखील नाल्यातील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. सलग समतर चरची कामे केल्यामुळे पाणी शिवारातच जिरण्यास मदत झाला आहे.
झालेले काम
वाढलेला पाणीसाठा
झालेला खर्च
जलसंधारण विभागामार्फत 2 सिमेंट बंधारे
36 टीसीएम
39 लक्ष
जलसंधारण विभागामार्फत सिमेंट बंधारे दुरुस्ती
60 टीसीएम
12 लक्ष
जिल्हा परिषदेमार्फत एक सिमेंट प्लग बंधारा
22.66 टीसीएम
15 लक्ष
कृषी विभागामार्फत दोन सिमेंट नाला बांध
15.64टीसीएम
30 लक्ष
वन विभागामार्फत दोन वनतळे
7 टीसीएम
4 लक्ष
जिल्हा परिषदेमार्फत नाला खोलीकरण
8 टीसीएम
97 हजार


याशिवाय जिल्हा परिषदेमार्फत एका पाझर तलावातील गाळ  लोकसहभागातून काढल्याने 7 टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. वडझिरे गावाच्या प्रत्येक भागात आज पाणी साठल्याचे चित्र पहायला मिळते आहे. गावकऱ्यात त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. उन्हाळ्यापर्यंत पाणीसाठा उपलब्ध होण्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जलयुक्त शिवार योजना गावासाठी वरदान ठरल्याची भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अर्जुन बोडके-जलयुक्त शिवार योजना गावासाठी समृद्धी आणणारी ठरली आहे. वडझिरेसह जायगाव, नायगाव आणि सोनगिरीचा काही भागाची पाण्याची समस्या दूर झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळेदेखील गावातील पडीक जमीन शेतीखाली आली आहे. पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत बदल होऊन शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. यासाठी शासनाना मनापासून धन्यवाद द्यायलाच हवे.


-डॉ.किरण मोघे

No comments:

Post a Comment