Thursday 17 August 2017

पाणी मागणी अर्ज

       लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी मागणी अर्ज

       नाशिक, दि. 16 : पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातील सिंचनाकरीता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून खरीप हंगामातील उभ्या पिकांसाठी संबंधित लाभधारक शेतकऱ्यांनी आणि सहकारी पाणी वापर संस्थांनी नमुना नंबर 7 चे पाणी मागणी  अर्ज संबंधित शाखा कार्यालयात दिनांक 18 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
          पाटबंधारे विभागाच्या लघु तलाव प्रकल्पातील 33 टक्के पाणी पिकांना संरक्षित सिंचनासाठी उलब्ध झाले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील लघु तलावातील पाणी उपलब्ध आहे. त्या नमूद तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी बागायतदार यांनी आपल्या  हद्दीच्या नजीकच्या शाखा कार्यालयात मुदतीत अर्ज दाखल करावेत. मुदतीनंतर आलेल्या पाणी  मागणी अर्जाचा विचार केला जाणार नाही.
          पाणी  अर्ज दाखल करतांना संबंधितांनी  त्यांचे नांवे असलेली सर्व थकबाकी  भरणे आवश्यक आहे. पाणी अर्ज दाखल करतांना चालू वर्षाचे सातबाराचे  उतारे जोडणे आवश्यक आहे. मागणी न करताच त्याचे क्षेत्रातील पिकास पाणी घेतल्याचे आढळून आल्यास तो पाणी वापर अनाधिकृत समजून त्यावर उभ्यापिकाचे क्षेत्राचा अनाधिकृत पाणी वापरांचा पंचनामा करण्यांत येणार आहे. लघु पाटबंधारे तलावाचे काठावर मंजूरी धारका व्यतिरिक्त कोणीही इलेक्ट्रीक  मोटारी  अथवा ऑईल इंजिन ठेवून वा पाईप अर्थात डोंगळे टाकून पाणी घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक कालवा अधिकाऱ्यांचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 च्या कलम 92 अन्वये त्यांचे इलेक्ट्रीक मोटार, ऑईल इंजिन व तत्संबंधीचे साहित्य जप्त करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित पाटबंधारे शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000

No comments:

Post a Comment