Thursday 10 August 2017

फळबाग बहरली

शेततळ्यामुळे फळबाग बहरली


राज्य शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरली आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील दिघवद गावच्या ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी आपल्या शेतात शेततळे बांधल्याने आणि सुक्ष्म सिंचनाची सुविधा केल्याने त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
ज्ञानेश्वर गांगुर्डे आणि त्यांचे दोन भाऊ साडेबारा एकरावर शेती करतात. बोअरवेलच्या माध्यमातून मका आणि सोयाबीनची पारंपरिक शेती करण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे उत्पादनही मर्यादीत होते. मात्र गतवर्षी शेततळ्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यावर शेतीत परिवर्तन झाले. पेरु आणि द्राक्षबागेचे क्षेत्र वाढले.

गांगुर्डे यांनी आपल्या शेतात 30 मीटर बाय 30 मीटर आकाराचे शेततळे बांधले आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून 47 हजार 500 रुपये अनुदान मिळाले. या शेततळ्याची क्षमता एकूण 32 लाख लिटर एवढी आहे.
पाणी उपलब्ध झाल्यावर त्यांनी दीड एकरातील पेरुच्या बागेपर्यंत आणि चार एकर द्राक्षबागेला पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. संपुर्ण शेतात ठिबक सिंचनाची सुविधा करून त्याच्या अनुदानासाठीदेखील त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. ‘उन्नत शेती’ अभियानांतर्गत सहा एकर क्षेत्रावर सोयाबीनचे प्रात्यक्षिकही कृषी विभागामार्फत करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.पवार यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरल्याचे गांगुर्डे सांगतात.


 या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून गांगुर्डे कुटुंबियांचे वार्षिक  उत्पन्न 18 लाखापर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या बागेतील पेरु मुंबईच्या बाजारपेठेत तर द्राक्षे स्थानिक बाजारपेठेत पाठविली जातात. सिंचन सुविधेमुळे द्राक्ष आणि पेरुच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे ज्ञानेश्वर सांगतात. यावर्षी उन्हाळी कांद्यातून एक लाख मिळविल्यावर पुढच्यावर्षी भाजीपाला घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त करून दाखविला. शाश्वत सिंचन सुविधेमुळे शेतात झालेले परिवर्तन इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक ठरले आहे.

No comments:

Post a Comment