Thursday 24 August 2017

अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन 1

सार्वजनिक मंडळानी प्रसाद तयार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक, दि. 25 : सणासुदीच्या काळात सार्वजनिक मंडळांनी प्रसाद बनविताना आणि वाटप करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व  औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उत्सवाच्या काळात वाटला जाणारा महाप्रसाद अन्न  पदार्थ असल्याने तो सुरक्षित असणे  आणि त्यापासून भाविकांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परीणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आल्या असून सार्वजनिक मंडळांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी तसेच प्रसाद उत्पादन व वितरण करणाऱ्या  व्यावसायिकांनी  अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियमावलीमधील तरतूदींचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल किंवा अन्न पदार्थ नोंदणीकृत व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी आणि झाकण असलेली असावी. फळांचा वापर करताना त्यांची खरेदी ओळखीलच्या नोंदणीकृत परवानाधारकाकडूनच करावी. कच्चे, सडलेल्या फळांचा उपयोग करू नये.
प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद तयार करण्यासाठी लागणारे पाणी पिण्यायोग्य असावे. प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी देण्यात यावे आणि त्याचे हात स्वच्छ असावे. स्वयंसेवक कोणत्याही त्वचा अथवा संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा.
दुध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी तापमानावरच साठवणूकीस ठेवावे. खव्याची वाहतूक रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी. जुना, शिळा, अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला खवा किंवा मावा प्रसादासाठी वापरू नये. अन्न पदार्थाबाबत शंका असल्यास आपल्या क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त (अनन्‍ ) यांचेशी संपर्क साधावा. एफडीए हेल्पलाईन क्र.1800222365 या क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) उ.श. वंजारी यांनी केले आहे.

-----

No comments:

Post a Comment