Thursday 10 August 2017

नो हॉर्न डे

नो हॉर्न डे…. मंडे हो या संडे !

वाहतूक हा प्रत्येक शहराच्या प्रगतीचा आणि कार्यसंस्कृतीचा आरसा असतो. वाहनांची वर्दळ ही समृद्धीचे प्रतीक मानले तरी या समृद्धीला शिस्तीची किनार असणे हे भौतिक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रगतीचे द्योतक आहे. वाहनधारकाचे रत्यावरचे वर्तन, वाहतूक पोलिसांना सहकार्य, नागरिकांची काळजी, वाहन चालविण्याची पद्धत यावरून त्याची मानसिक स्थिती लक्षात येते.
संयमित आणि सुसंस्कृत नागरिक वाहन चालवितांनादेखील सामाजिकतेचे भान ठेवत असतो. वैचारिकदृष्ट्या पुढारलेली व्यक्ती कमीत कमी ध्वनी प्रदुषण किंबहुना वाहन चालविताना किमान आवाज करणारी, हॉर्नचा मर्यादीत वापर करणारी असते.  ते त्यांच्यातील प्रगल्भतेचे खऱ्या अर्थाने साक्षरतेचे लक्षण मानण्यात येते. सगळ्या गोष्टी समजून- उमजून घेतल्या की मग  कोणास त्रास  देणे होत नाही, हेच यातून स्पष्टपणे पुढे येते. कर्णकर्कश्य आवाज करणे हे  उथळपणाचे आणि संयम नसल्याचे प्रतिक आहे.
ध्वनीप्रदुषणाचा त्रास प्रत्येकाला होतो.  मंजुळ आवाज हवाहवासा वाटतो, अन्यथा कानाला आणि मनाला त्रास देणारा आवाज प्रत्येकाल नकोसाच असतो. यादृष्टीने गाड्यांच्या हॉर्नचा वापर कितपत करावा याचा विचार होणे गरजेचे आहे.
वाहतूक खोळबंली की आपण नकळत हॉर्न कडे हात नेवून आपला संताप व्यक्त करतो. पण खरोखरच तसे केल्याने वाहतूक मोकळी होते,शिस्त लागते वा व्यव‍स्थीत होते असे होत नाही. याउलट हॉर्नच्या मोठ्या आवाजाने लहान- थोरांच्या कर्णपटलावर प्रतिकूल परिणाम होतात. तसेच चिडचिड वाढणे,मानसिक संतूलन बिघडणे या सारख्या तक्रारी डोकावू लागतात. बऱ्याचदा हे माहित असूनही आपण हॉर्नचा अनाठायी उपयोग करीत असतो.
सभ्य समाजाला शोभा न देणारे वर्तन समाजातील कोणत्याच घटकाकडून होऊ नये आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदुषणरहीत वातावरण निर्माण व्हावे यादृष्टीने ‘नो हॉर्न डे’ पाळणे गरजेचे आहे. रत्यावर वावरतांना हॉर्न न वाजविणे म्हणजे आपल्या अंगी असलेला संयम  आणि संवेदना अधिक दृढ करणे होय.
थोडक्यात नो हॉर्न डे पाळण्यामागे एक संकल्पना आहे, एक विश्वास आहे, एक दिलासा आहे, एक शिस्त आहे, एक स्वभाव आहे, एक प्रगल्भता आहे, एक सामंजस्य आहे, एक आदर्श आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक विचार आहे.  हा विचार प्रत्येकाने स्विकारणे यातच सर्वांचे हीत आहे.
आपल्याकडे वाहन असताना मिजास मिरविण्यासाठी हॉर्नचा वापर योग्य नसल्याची समज आणि उमज आपण वाहधारकांना दिली पाहिजे. ‘नो हॉर्न’  अभियानाच्या प्रभावाचा विचार न करता सुरूवात निश्चितपणे करायला हवी. याचा कितपत प्रभाव होईल  असा विचार करण्यापेक्षा आपले योगदान महत्वाचे याचा विचार करणे हे खरे नागरिकत्वाचे लक्षण आहे.
नागरीक म्हणून समोरच्यांनाही दिलासा आणि स्वत:ला समाधान मिळेल अशी कृती आपल्याकडून अपेक्षित आहे.  .... तेव्हा या अभिनयात सहभागी व्हा  आणि सदैव ‘नो हॉर्न डे’ पाळा. मी वाचकांना दर्शवू च्छितो की मी 2005 पासून आजपर्यंत हॉर्न वाजविलेला नाही, तसेच शासकीय वाहनचालकांनाही हॉर्न न वाजाविण्याच्या सुचना दिलेल्या असून त्याचे कटाक्षाने पालन केले जाईल याची जागरूकता नेहमी बाळगत असतो. मी केले, तुम्हीदेखील करू शकता! आणि करून पाहा ! आपण नक्कीच यशस्वी होऊ.... संडे हो या मंडे......  प्रत्येक दिवस ‘नो हॉर्न डे!’

-रविंद्र सिंगल

No comments:

Post a Comment