Saturday 12 August 2017

लोकसहभागातून विकास

घोडांबेत लोकसहभागातून विकासाला गती

सुरगाणा तालुक्यात आदिवासी भागातील घोडांबे गावात लोकसहभागातून अनेक विकासाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गाव हागणदारीमुक्त करण्याबरोबरच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी गावातील महिलादेखील पुढाकार घेत आहेत.
गेल्या काही वर्षापासून या आदिवासी भागाने कात टाकली आहे. पारंपरिक शेती ऐवजी स्ट्रॉबेरीची शेती करण्याकडे ग्रामस्थांचा जास्त कल आहे. घोडांबेतील 90 टक्के शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. गुजरातच्या बाजारात ही स्ट्रॉबेरी जाते. बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यानंतर आपले गावही बदलायला हवे असा विचार तरुण सरपंच अशोक भोये यांनी केला.

तेराशे लोकसंख्येच्या या गावात 2003 मध्ये गॅस्ट्रोची साथ आली होती. त्यानंतर गावात हळूहळू आरोग्याबाबत जागृती निर्माण होवू लागली. मात्र शौचालय बांधण्याकडे कल कमीच होता. 2014 पर्यंत केवळ 50 टक्के कुटुंबांकडे शौचालय होते. सरपंच भोये आणि ग्रामसेवक हेमराज वाडबुद्धे यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेत ठराव करून शौचालय नसणाऱ्यांना दाखला देणे बंद करण्यात आले.
त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यातच ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शौचालय उभारण्यासाठी क्रेडीटवर साहित्य खरेदी करून दिल्याने शौचालय उभारणीला वेग आला आणि गाव हागणदारी मुक्त झाले. गावात आज सर्व 184 कुटुंबांकडे शौचालय आहे. घरोघरी कचराकुंडी ठेवण्यात आली असून परिसर स्वच्छतेची काळजी प्रत्येक घरातील महिला घेतात.
प्रत्येक घराला नळजोडणी देण्यात आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. काही ठिकाणी सांडपाण्याच्या माध्यमातून परसबाग तयार करण्यात आली आहे.

 शाळेत  लोकसहभागातून दोन वर्ग खोल्या उभारण्यात आल्या आहेत. मुलांच्या शिक्षणासंदर्भात ग्रामस्थ जागरूक आहेत. शाळेत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सुविधा आहे.  गाव तंटामुक्त आहे. दरवर्षी गावात वनराई बंधारे बांधून पाणी अडविले जाते. गावात 4 हजारावर झाडे आहेत. लग्नात मानपान न देता रोपे देण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सुरू केला आहे. गावात रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण शंभर टक्के आहे.

आदिवासी भाग असूनही विकासाची ओढ आणि त्याबाबतीतल्या नियोजनामुळे या ग्रामपंचायतीने तालुका स्तरावारीलस्मार्ट ग्रामपुरस्कार मिळविला. विकासाची गती अशीच ठेवत गावाला पुढे नेण्यासाठी नागरिकही तेवढेच प्रयत्न करतात हे विशेष.
सुवर्णा गांगुर्डे, पं..सभापती-विकासात लोकसहभाग हे गावाचे वैशिष्ट्य आहे. तरुण पिढीने गावाला बदलण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाकडे आता  लक्ष द्यायचे आहे. वॉटर एटीएकच्या माध्यमातून शुद्ध पाणी ग्रामस्थांना देण्याबरोबरच परिसरातील पर्यटन लक्षात घेता ते आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत ठरावे याचाही प्रयत्न करणार आहोत.


No comments:

Post a Comment