Tuesday 15 August 2017

भारतीय स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन

जिल्ह्याच्या विकासात नागरिकांनी योगदान द्यावे- गिरीष महाजन

नाशिक, दि. 15 : शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नात सहभागी होऊन नागरिकांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात श्री.महाजन यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , महापालिका आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, स्कुल ऑफ आर्टीलिअरीचे ब्रिगेडिअर व्ही.शर्मा आदी उपस्थित होते.


 विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करून श्री.महाजन म्हणाले, शेतकरी संपन्न आणि कायमचा कर्जमुक्त व्हावा यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. जिल्ह्याने जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनांची चांगली अंमलबजावणी केल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.

राज्यात यावर्षी कोल्हापूरी बंधाऱ्याची दारे वेळेवर बंद करून पाणी अडविण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढून त्याचा शेतीला लाभ होईल.जिल्ह्यात रासायनिक खत अनुदानाबाबत पथदर्शी प्रकल्पांतर्गत ईपीओएस मशिनद्वारे खतांची विक्री करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

चार कोटी वृक्ष लागवड, घरकूल योजना, स्वच्छता अभियान, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आदी विविध योजनांच्या संदर्भात जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सला चालना देण्यात येत असून  सातबारा संगणीकीकरण, -डिस्निक प्रणालीचा वापर, सार्वजनिक वितरण प्रणालीत ईपीओएस यंत्राचा वापर, ऑनलाईन दाखले वाटपातही जिल्ह्याची चांगली कामगिरी असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

गतवर्षी राबविण्यात आलेल्या महाअवयवदान अभियानामुळे अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून अवयवदानाची संख्या वाढली आहे. यावर्षीदेखील 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार  असून गरजू रुग्णांना नवजीवन देण्यासाठी नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर  यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सैय्यद आणि पोलीस पदक जाहीर झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिक प्राप्त हिवरेबाजार जि.अहमदनगर ( प्रथम रुपये 10 लाख), अवनखेड ता.दिंडोरी जि.नाशिक (द्वितीय रुपये 8 लाख) आणि मलांजन ता.साक्री जि.धुळे (तृतीय रुपये 6 लाख ) या ग्रामपंचायतींना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

माळेगाव जि. नाशिक ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक आणि पुरुषोत्तम नगर ता.शहादा जि.नंदुरबारला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुर्व उच्च माध्यमिक, पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महापालिकेच्या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिकेतर्फे रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी यस बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या प्रिपेड स्मार्ट कार्डचा आणि 45 नागरी ऑनलाईन सेवांचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रिपेड कार्ड सर्व ठिकाणी वापरता येणार असून नियमित कर भरणाऱ्या 50 हजार नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन सेवा उपलब्ध झाल्याने बहुतांशी सेवांचा लाभ नगरिकांना घरबसल्या मिळणार असून त्यांना महानगरपालिकेत येण्याची आवश्यकता भासणार नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, शशीकांत मंगरुळे, सरीता नरके, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, तहसिलदार सी.एस. देशमुख आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानी वाहनचालकाच्या हस्ते ध्वजारोहण
          विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निवासस्थानी त्यांचे वाहनचालक दत्तु इलग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री.झगडे यांचे कुटुंबिय, स्वीय सहायक विजय सोनवणे आणि कर्मचारी उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment