Thursday 24 August 2017

‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध

‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध
       स्वाईन फ्लू हा हवेमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएन्झा- ए  एच 1 एन 1 या विषाणुमुळे होतो. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि क्वचित प्रसंगी उलट्या व जुलाब ही स्वाईन फ्लूची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
          या आजाराचा प्रसार हवेतून होतो. स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून हे विषाणू हवेद्वारा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. आपल्याकडे आढळणारा नेहमीचा फ्लू आणि स्वाईन फ्लू यांची लक्षणे सर्वसाधारणपणे सारखीच आहेत. तसेच सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजार अंगावर काढू नये. उपचारास विलंब करु नये.
          स्वाईन फ्लूकडे दुर्लक्ष केल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या आजारासाठी शासनाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
Ø सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरीच थांबावे. जनसंपर्क टाळावा.
Ø शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा.
Ø डॉक्टरांनी दिलेल्या औषधाशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, असे घरगुती उपायही करावेत.
Ø घरातील टेबल, टीपॉय, संगणकाचा की बोर्ड यासारखे पृष्ठभाग वारंवार स्वच्छ करावेत.
Ø वारंवार हात , साध्या साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत.
Ø आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी शारिरीक , मानसकि ताण टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी व ई व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
Ø लक्षणे दिसताच 36 तासांचे आत उपचार सुरु करावा.
Ø बरे वाटले तरी टॅमी फ्ल्यूचा पाच दिवसांचा पूर्ण डोस घ्यावा.
Ø धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकला, गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे उदा. सिनेमागृह, बाजार, एस.टी. स्टॅण्ड इ. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे  हे टाळावे.
स्वाईन फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वेळीच औषधोपचार केल्यास या आजारापासून पुर्णपणे संरक्षण करता येते. वेळीच प्रतिबंध करणे हेच स्वाईन फ्लूपासून खरे संरक्षण आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या   आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
----

No comments:

Post a Comment