Thursday 7 September 2017

‘नाशिक ट्रॅव्हल मार्ट’

इगतपुरीचावेलनेस हबम्हणून विकास करणार-जयकुमार रावल

          नाशिक दि. 7- जगभरातून वेलनेस टुरिझमला चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी इगतपुरीच्या वेलनेस हब म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
          महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक ट्रॅव्हल्स एजन्टस् असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल एक्सप्रेस इन इथे आयोजित नाशिक ट्रॅव्हल मार्ट’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार डॉ.राहुल आहेर,  सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, शिर्डी संस्थानचे सुरेश हावरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे  सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते.

          श्री.रावल म्हणाले, जिल्ह्यात निसर्ग, कृषी, पर्यटन, ऐतिहासिक गड-किल्ले, पक्षी अभयारण्य, पावसाळी पर्यटन आणि वाईनरीज असे पर्यटनासाठी आवश्यक विविध घटक उपलब्ध आहेत. मुंबईशी असणारी समीपतादेखील पर्यटनाला पूरक आहे. आदरातिथ्याच्या चांगल्या सुविधादेखील नाशिकमध्ये आहेत. या सर्व बाबींचा लाभ घेत नाशिक मधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल आणि लवकरच जपान येथील गव्हर्नर निसाका यांची नाशिक भेट आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
          ते म्हणाले, ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती रुजविण्यास प्राधान्य देण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरातील सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न पर्यटन महामंडळामार्फत होत आहे. क्रुझ पर्यटनासारख्या नव्या संकल्पना अंमलात आणल्या जात आहेत. देशाबाहेरील पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत पर्यटकही राज्यात यावेत यासाठी विविध तीर्थस्थळांचे सर्कीट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  हे करीत असतांना पर्यटनस्थळांचे मार्केटिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. नाशिक ट्रॅव्हल मार्ट त्यादृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          भारतात जगातील पर्यटनस्थळांपेक्षा अधिक चांगली स्थळे असल्याचे नमूद करून श्री. रावल म्हणाले, राज्यातदेखील सुंदर समुद्र किनारा, 450 गड-किल्ले, अभयारण्ये, युनेस्कोने वारसा घोषीत केलेली पाच पर्यटनस्थळे, पश्चिम घाटावरील जैवविविधता, तीर्थस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांनी या स्थळांना भेटी दिल्यानंतर त्यांना अधिक आनंद लुटता यावा यासाठी विविध सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, त्यांना शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. टूर ऑपरेटर्सने राज्याला पसंती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
          मुंबईला 23 डिसेंबर ते 1 जानेवरी दरम्यानमुंबई मेलाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकला  लोणावळा-खंडाळ्याचा पर्याय म्हणून विकसीत करण्यात येईल आणि लवकरच एमटीडीसीमार्फत द्राक्ष महोत्सव भरविण्यात येईल, असे श्री.रावल यांनी सांगितले.

          खासदार संभाजीराजे म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा, वारसा हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे घटक आहेत. आपल्या क्षमता जगासमोर आणण्याची गरज आहे. साठपेक्षा अधिक गड-किल्ले असल्याने नाशिकला ऐतिहासिक पर्यटनासाठी चांगली संधी आहे. टूर ऑपरेटर्स पर्यटनाचा कणा असल्याने नाशिक ट्रॅव्हल एजन्टस्असोसिएशनने घेतलेला पुढाकार महत्वाचा असून राज्यातील इतर जिल्ह्यांना हा उपक्रम मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
          नाशिकचे स्वतंत्र टुरिझम सर्कीट विकसीत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना टुरिस्ट गाईडसाठी स्वतंत्र संस्था उभारण्यासाठी पर्यटनक्षेत्रातील व्यावसायिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
          दत्ता भालेराव यांनी प्रास्ताविकात नाशिक पर्यटन सर्कीट म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. देशभरातील 600 संस्थांचे प्रतिनिधी  आणि 25 एअरलाईन्सचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.
          श्री.राठोड यांनी इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे चांगली पर्यटनस्थळे असल्याने पर्यटन विकासाला पोषक वातावरण असल्याचे सांगितले. ट्रॅव्हल मार्टमधून येणाऱ्या सुचनांचे स्वागत असून त्यामाध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी ढोल पथकाने शानदार प्रात्यक्षिके सादर केली. मंगळागौरीचे पारंपारिक खेळ आणि अलिसा यांच्या व्हायोलिन वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढविली. श्री.रावल यांच्या हस्ते योगासनाचा विश्वविक्रम करणाऱ्या प्रज्ञा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमाला नारायणराव शेलार, ब्रिजमोहन चौधरी, प्रसन्ना पटवर्धन, सुधीर पाटील, केदार कासार, कृष्णकुमार, मनोज वासवानी, राजेंद्र बकरे, जयेश तळेगावकर, सागर वाघचौरे, अंबरीश मोरे आदी उपस्थित होते.


----

No comments:

Post a Comment