Saturday 9 September 2017

आरोग्यमंत्यांराची रुग्णालयाला भेट

जिल्हा रूग्णालयात लवकरच पाच इन्क्युबेटरची व्यवस्था-डॉ.दिपक सावंत

नाशिक दि.9-शासन बालमृत्युबाबत अत्यंत संवेदनशील असून लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच ते सहा नवीन इन्क्युबेटरची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.
जिल्हा रूग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्युसंदर्भात डॉ.सावंत यांनी आज रुग्णालयातील नवजात शिशु विशेष दक्षता कक्षाला तातडीने भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार जयंवतराव जाधव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार, संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.एन.गुठे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, विजय करंजकर आदी उपस्थित होते.
डॉ.सावंत म्हणाले, जिल्हा रुग्णालयात 200 किलोमीटर परिसरातून नवजात बालके उपचारांसाठी दाखल होतात. दरवर्षी रुग्णालायत सामान्य: 28 हजार बालके उपचारासाठी दाखल होत असत. हे प्रमाण सुमारे 50  हजारांपर्यंत पोहोचले आहे. यातील 44 टक्के बालके बाहेर जन्मलेली असतात. अशा बालकांमुळे जंतूसंसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. एप्रिल-मे महिन्यात स्थलांतरीत नागरीक शहरात आल्यानेदेखील जंतूसंसर्गाचे  प्रमाण वाढते. ते कमी करण्याचे मोठे आवाहन आरोग्य यंत्रणेपुढे आहे. या आवाहनाला सामोरे जातान अत्यंत कमी वजनाच्या नवजात बालकांनादेखील येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे. रुग्णालयात केंद्राच्या मानकाप्रमाणे व्हेंटीलेटरची संख्या आहे आणि आवश्यकता वाटल्यास व्हेंटीलेटरची संख्यादेखील वाढविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 बालमृत्युच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्याचे निर्देश तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासन या प्रकरणी गंभीर असून लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. माता आणि बाल आरोग्य कक्षासाठी 21 कोटी मंजूर करण्यात आले असून या कक्षाच्या उभारणीसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात सुचना दिल्या असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

                  संदर्भ रुग्णालयातील यंत्रणा त्वरीत सुरू करा-डॉ.सावंत
संदर्भ रुग्णालयात बंद पडलेल्या यंत्रणा येत्या तीन आठवड्यात सुरू कराव्यात, असे निर्देश डॉ.सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. संदर्भ रुग्णालयात खाजगी रुग्णालयाएवढेच चांगले उपचार होत असून गरजू रुग्णांवर त्वरीत उपचार करण्यासाठी यंत्रणा चांगल्यारितीने सुरू राहिल याकडे विशेष  लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांवर अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफीचे उपचार होत असल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले.  
                                                 -----

No comments:

Post a Comment