Friday 8 September 2017

लोणजाई माता मंदिर भेट

लोणजाईमाता क्षेत्र पर्यटन विकासासाठी सहकार्य-जयकुमार रावल


नाशिक, दि.8 :  ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या लोणजाईमाता क्षेत्र पर्यटन विकासासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील आणि  त्यासाठी शक्य ती सर्व मदत शासन करेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
निफाड तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील लोणजाई माता मंदिरास श्री. रावल यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापती पंडीत आहेर, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, पंढरीनाथ थोरे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

 श्री. रावल म्हणाले, पर्यटक व भाविकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने  या स्थळाचा विकास होणे गरजेचे आहे. लोंणजाईमाता डोंगर  आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनासाठी  पुढे यावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे.
पर्यटन मंत्री म्हणाले, लोणजाईमाता क्षेत्र पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून पुणे, मुंबई व दिल्ली सारख्या महानगरांमध्ये या स्थळाची माहिती पोहचवून येथे भेट देण्यास आवाहन केले जाईल. निसर्ग संपन्न वातावरणामुळे येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना आनंद मिळेल, असे त्यांनी सांगितले.


श्री.रावल यांनी मंदिर परिसराची व या डोंगर पायथ्याशी असलेल्या प्राचीन जलकुंडांची पाहणी केली. नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील  विंचूर पासून जवळच असलेल्या या पेशवेकालीन धार्मिक स्थळास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परिसरातील नागरीकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या ठिकाणी नवरात्रौत्सवास भाविकांची मोठी गर्दी असते.               
                                                       ----

No comments:

Post a Comment