Sunday 24 September 2017

पालखेड जलयुक्त

काजळी झाली गाळमुक्त आणि पालखेड-शिरवाडे वणी परिसर जलयुक्त

          नाशिक दि.25- निफाड तालुक्यतील पालखेडआणि शिरवाडे वणी गावाच्या सीमेवरील काजळी नदीच्या पात्रातील गाळ काढल्याने नदीपात्रातील पाणीसाठा वाढून परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.
          पालखेड गावातून पालखेड डावा कालवा तर शिरवाडे वणीमधून ओझरखेड कालवा जातो. मात्र कालव्यातून शेतीसाठी मिळणारे पाणी पुरेसे होत नाही. शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी बरेच कष्टक करावे लागतात आणि त्यासाठी अनेकदा वादही होतात. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र केले. उपविभागीय अधिकारी महेश पाटील आणि कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.

          काजळी नदीचे पात्र संपुर्ण गाळाने भरलेले असल्याने तिच्यावर बांधलेल्या बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसे. शिवाय पावसाळ्यात शेजारच्या शेतातही पाणी  गेल्याने नुकसान होई. अनेकदा बंधाऱ्याची उंची कमी करण्याबाबतही विचार करण्यात आला. पाणीसाठा वाढविण्यासाठी  नदीतील गाळ काढणे आवश्यक होते. शाखा अभियंता अर्जुन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे रोजी या कामाला सुरूवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागामुळे साधारण एक महिन्यात काम पुर्ण करण्यात आले.
          गाळ काढण्यासाठी एक पोकलँड, एक जेसीबी, 30 ट्रॅक्टर  आणि चार डंपरचा उपयोग करण्यात आला. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने यंत्रसामुग्रीसाठी डिझेल उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांनी स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ शेतात वाहून नेला. एकूण 15 शेतकऱ्यांच्या शेताला त्यामुळे फायदा झाला असून या भागात मका, टोमॅटो, कोबी, मिरची आदींची लागवड करण्यात आली आहे.

गावात तीन बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला आहे. एका ठिकाणी 600 मीटर नदीपात्रात 15 फूट खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची 72 टीसीएमने क्षमता वाढली आहे.  तर इतर दोन ठिकाणी  180 मीटर आणि 250 मीटर खोलीकरण करण्यात आल्याने  105 टीसीएम क्षमता वाढली आहे.

एकूण 170 डंपर आणि 400 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. शिवाय बंधाऱ्याची गळती बंद करण्यासाठी पाच मीटर मातीचा थर बंधाऱ्याच्या आतल्या बाजूस देण्यात आला आहे. शेतीसाठी अनुपयुक्त गाळ नदीच्या बाजूस टाकल्याने शेताकडे जाण्यासाठी चांगला रस्तादेखील तयार झाला आहे.

 नदीच्या किनाराला दोन्ही गावातील किमान शंभर विहिरीला लाभ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वर्षाअखेर कोरडे पडणाऱ्या नदीपात्रात यावर्षी उन्हाळी पिकासाठीदेखील पाणी राहिल आणि पाणी जिरल्याने विहिरींद्वारेदेखील सिंचन करता येईल, असा ग्रामस्थांना विश्वास आहे.
पंडीत आहेर, पं.स.सभापती-योजना राबविताना होणाऱ्या लाभाबाबात शंका होती. मात्र आता वाढलेला पाणीसाठा पाहून विश्वास वाढला आहे. पुढील वर्षी आणखी काही ठिकाणी ही योजना राबविण्याचा विचार आहे. शिवार जलयुक्त होण्यासाठी ही योजना खरोखर उपयुक्त आहे.


No comments:

Post a Comment