Thursday 28 September 2017

स्वच्छ भारत आढावा बैठक

स्वच्छता अभियानात महाराष्ट्राची कामगिरी देशात सर्वोत्तम
                                                                   -बबनराव लोणीकर

          नाशिक दि.28- देशभरात राबवण्यिात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली असून राज्याला 2018 पर्यंत हगणदारी मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा , असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर यांनी केले.

 विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित स्वच्छता अभियानाच्या नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उज्वला पाटील, आमदार डॉ.राहुल अहिरे, दिपीका चव्हाण, सुरेश भोळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, उपसचिव रुपेश जयवंशी, विभागातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

          श्री.लोणीकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत राज्याने शौचालय बांधकामात चांगली कामगिरी केली. राज्यातील 15 जिल्हे , 163 तालुके, 18 हजार ग्रामपंचायती आणि 26 हजार गांवे हगणदारी मुक्त झाली आहे. स्वच्छता अभियासाठी विभागाला 194 कोटीचा निधी देण्यात आला असून मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने गरज भासल्यास सीएसआर निधीतून सहकार्य करण्यात येईल. निधीच्या उपलब्धतेबरोबर लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणणेही गरजेचे असून त्यासाठी लोकजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

          ते म्हणाले, देशाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी आपल्या संदेश आणि कृतीतून स्वच्छतेचा आदर्श प्रस्तुत केला आहे.  अस्वच्छतेमुळे नदीपात्रात दुषीत पाणी जाऊन त्याचा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. म्हणूनच शासनाने स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

          शौचालय बांधण्यासाठी अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या 4 हजाराच्या रकमेत 12 हजारापर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे त्यात सहभाग घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. 2018 पर्यंत जिल्हा हगणदारी मुक्त न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

          श्री. लोणीकर यांनी विभागात राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी 360 कोटी, जलस्वराज्य टप्पा- 2 साठी 94 कोटी राष्ट्रीय पेयजलसाठी 58 कोटी अशी एकुण 512 कोटीचा निधी विभागासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
          जुन्या योजना अपूर्ण असतांना केंद्राचा निधी  मिळत नसल्याने पाणी पुरवठ्यासाठी शासनाने मुख्यमंत्री पेयजल योजना सुरु केली आहे. या योजनेची कामे त्वरीत सुरु करण्यात यावी. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या कार्यकारी अभियंत्यांनी त्वरीत दुर करुन घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

          श्री. झगडे म्हणाले, जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. उद्दिष्टपूर्तता कमी असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात यावी. विभागाची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक होईल या दिशेने प्रयत्न करावे. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे  एक ते दीड महिन्यात सुरु होतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकरण आणि पाणीपुरवठा या संदर्भात भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

उपसचिव जयवंशी यांनी स्वच्छता अभियान आणि पाणीपुरवठा योजनांची जिल्हानिहाय माहिती सादर केली. बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्यात 61 टक्के, धुळे 69 टक्के, नाशिक 78 टक्के, जळगाव 63 टक्के तर  अहमदनगर जिल्ह्यात 82 टक्के शौचालये बांधण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी अनेाखी कल्पना राबवित विशेष प्रयत्न करणाऱ्या ग्रामसेवक किशोर विभुते, सुनिल तुपे, संदीप जाधव यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


शासकीय कार्यालयांना भेट
       बैठकीनंतर श्री.लोणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी कार्यालय स्वच्छ ठेवण्यात यावे आणि कार्यालयातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन कागदपत्रांच्या डिजीटल प्रती जतन करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. आरोग्याच्यादृष्टीने पाणी महत्वाचा घटक असल्याने राज्यात सहा ठिकाणी पाण्याचे नमुने  तपासण्यासाठी कार्यशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. अत्यंत काळजीपूर्वक आणि सेवाभावनेने आपले काम करा, असा संदेश श्री.लोणीकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिला.
         

-----

No comments:

Post a Comment