Monday 4 September 2017

भोयेगावची ‘आयएसओ’ शाळा

भोयेगावची आयएसओ शाळा

शाळेतील विद्यार्थी मोकळ्या आकाशाखाली वाचन करतात...संगणक कक्षात किबोर्डवर त्यांची बोटे चटकन चालतात....ई-लर्निंग कक्षात वायफायच्या सहाय्याने टॅबवर नवी माहिती मिळवतात.... झरझर झाडावर चढतात.......शाळेच्या उपक्रमांची आत्मविश्वासाने माहितीदेखील देतात....कवितेचा अभ्यासही स्टाईलमध्ये...श्रमसंस्कार येथे घडतात आणि सोबत धमालही...भोयेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अशा अनेक वैशिष्ट्यांच्या आधारे आयएसओ मानांकन मिळविले आहे.

तीन वर्षापूर्वी सर्व शिक्षा अभियान आणि एम्पथी फाऊंडेशन मुंबईच्या माध्यमातून शाळेचे नुतनीकरण सुरू करण्यात आले. फाऊंडेशनकडून एक कोटी  तर सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून 19 लाख रुपये उपलब्ध झाले. आठ वर्गखोल्या, सुविधायुक्त स्वच्छतागृहे आणि संगणकक्ष असणारी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली. शिक्षक निवृत्ती आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसर विकासाकडे तेवढेच लक्ष दिले. कल्पकता आणि शाळेप्रतीची आस्थेमुळे इमारतीला साजेस सुंदर परिसर शाळेभोवती तयार करण्यात आला आहे.
संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धनही चांगल्याप्रकारे करण्यात आले आहे. एक मूल एक झाड उपक्रमांतर्गत 267 झाडे लावण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीने बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आली असून त्यात औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त आणि आनंददायी शिक्षण घेण्याच्या सुविधा या परिसरात आहे. इमारतीचे सांगली पॅटर्ननुसार जलपुर्नभरण करण्यात आले आहे.

शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर विशेष लक्ष देण्यात येते.  जुलै 2014 मध्ये श्रेणीत असलेल्या शाळेने डिसेंबर 2014 मध्ये श्रेणी मिळविली आणि तेव्हापासून शाळा प्रगतीपथावर पुढेच जात आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. ऑक्टोबर 2015 मध्ये आयएसओ 9001:2008 मानांकन शाळेला मिळाले. सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टरचा वापरही शाळेत करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना श्रम आणि संस्कृतीचे संस्कार घडविण्याबरोबरच आधुनिक शिक्षणाकडेदेखील शिक्षक लक्ष देतात. प्रत्येक वर्षी शाळेच्या विकासासाठी शिक्षक स्वत: प्रत्येकी पाच हजार रुपये देतात. व्हर्चुअल क्लासरूमसाठी माजी विद्यार्थ्यांनी सात संगणक उपलब्ध करून दिले आहे. आयएसओ मानांकन मिळाल्याने कृषीभुषण शिवराम बोरसे यांनी शाळेला 25 हजार रुपये भेट दिले. टॅब, दरवाजे, बोअरवेल आदी सुविधाही लोकसहभागातून करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचेदेखील शाळेच्या विकासात योगदान आहे.  

गेल्या तीन वर्षात पटसंख्या 223 वरून 270 पर्यंत पोहोचली आहे. एलसीडी प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेअरच्या सहाय्याने ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिऊ-काऊ स्टँडच्या  माध्यमातून निसर्गाप्रतीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसीत केली जाते. गांडुळखत प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे धडे दिले जातात. डॉ.एपीजे अब्दुल कलाम वाचन कट्ट्याच्या माध्यमातून आनंददायी वाचनाची अनुभुती विद्यार्थ्यांना मिळते. गणितजत्रा, विज्ञानजत्रा, शालेय बोलका व्हरांडा, शनिवारी योगासने आणि व्याख्यान, पुष्परचना स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने नागरिक घडविण्याचे कार्य शाळेच्या माध्यमातून येथे होत आहे.

शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या वर्गाला उपस्थितीध्वज आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असलेल्या वर्गाला आरोग्यध्वज, स्वच्छ विद्यार्थी बॅच असे कल्पक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यात येतात.  तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने अभ्यासक्रमपूरक डीव्हीडी तयार करण्याचे काम सुरू आहे. इतरही अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. विशेष म्हणजे शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचे पुर्ण सहकार्य मिळत असल्याने शिक्षकांचाही उत्साह वाढला आहे. शाळेला गावाचा आधार....गावाला शाळेचा अभिमान हे विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या प्रयत्नातून सिद्ध करून दाखविले आहे.
रामकृष्ण पगार, मुख्याध्यापक-शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे पुर्ण सहकार्य आहे. संस्कार, उत्तम शिक्षण, चांगल्या सुविधा देण्याचा सर्व शिक्षक एकत्रितपणे प्रयत्न करतात. विद्यार्थीदेखील शाळा सुंदर ठेवण्याचा छान प्रयत्न करतात. शैक्षणिक गुणवत्तेच्या माध्यमातून शाळेचे नाव उंचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

----

No comments:

Post a Comment