Friday 1 September 2017

संवादपर्व राजदेरवाडी

संवादपर्व’च्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती

नाशिक दि.1-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राजदेरवाडी येथे आयोजित संवादपर्व कार्यक्रमातून अवयवदान आणि स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शैलेश निकम, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, मनोज शिंदे, बापू आहेर, दिपक जाधव आदी उपस्थित होते.
सामाजिक जाणीवेतून अवयवदानाचा संकल्प करीत नवे जीवन फुलविण्याचा प्रयत्न करा आणि अवयवदान महोत्सवातील जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन चांदवड तालुक्याचे आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी केले.

ते म्हणाले, अवयवदानाच्या माध्यमातून किमान आठ व्यक्तींना नवे जीवन देता येते. मेंदू मृत्यु झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सहमी दिल्यास अवयवदान करता येते. अवयव प्रत्यारोपण मर्यादीत वेळेतच करणे शक्य असल्याने दु:खाच्या प्रसंगातही तात्काळ निर्णय घेतल्यास अवयवदान करता येते. याद्वारे आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृती नवे जीवन मिळालेल्या रुग्णाच्या रुपाने कायम राहात असल्याने अधिकाधीक व्यक्तींनी अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वाईन फ्लूविषयी माहिती देताना ते म्हणाले, वेळेवर उपचार केल्याने या आजाराचा धोका टाळता येणे शक्य आहे. ताप, सर्दी , खोकला अशी लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेणे आवश्यक आहे. याठिकाणी स्वाईन फ्लूसाठी आवश्यक औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व युक्त पदार्थ, हिरव्या भाज्या, डाळी आदींचे  सेवन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.मोघे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमीका स्पष्ट केली. नागरिकांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छता,आरोग्य, शिक्षण विषयक उपक्रम राबवून गावाच्या विकासाबाबत एकत्रित बसून चर्चा करावी, असे आवाहन केले. यावेळी आरोग्य सेवकांनी हात धुण्याचे महत्व व प्रात्यक्षिक सादर केले.

No comments:

Post a Comment