Friday 8 September 2017

प्रदर्शन उद्घाटन

प्रत्येक जिल्ह्याने पर्यटनासाठी ब्रँडींग करणे आवश्यक-जयकुमार रावल


          नाशिक दि. 8-  नाशिकच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रातील  वैशिष्ट्य जाणून पर्यटनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडींग करावे, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
           नाशिक ट्रॅव्हल मार्ट  अंतर्गत प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, एमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे,  तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव, लक्ष्मण सावजी यांच्यासह विविध ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

          श्री.रावल पुढे म्हणाले, पर्यटन हा चोवीस  तास  आणि वर्षभर सुरू राहणारा व्यवसाय आहे.  पर्यटनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासोबतच रोजगार निर्मिती होत असते. त्यामुळे पर्यटनक्षेत्राला चालना देण्याचे काम पर्यटन विकास महामंडळाकडुन  करण्यात  येत आहे. तानसारख्या इतरही संस्थांनी पुढे येऊन आपल्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग केल्यास पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती देखील होईल, असे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील आल्हाददायक हवामान पर्यटनासाठी महत्वाचा घटक असून  2 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत नाशिकमध्ये ‘ग्रेप हार्वेस्टिंग फेस्टिवल’ आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटन वाढीसाठी अशी विविध वैशिष्ट्ये जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. नाशिक ट्रॅव्हल मार्टसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून असे मार्केटींग शक्य आहे. अशा सकारात्मक प्रयत्नांना पर्यटन विभागातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 श्री.रावल यांनी पर्यटकांच्या वाहतूक सुविधेबाबत विविध पर्यायांसदर्भात विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.  तसेच तानमार्फत लावण्यात आलेल्या विविध ट्रॅव्हल कंपन्यांच्या प्रदर्शनाला श्री.रावल यांनी भेट दिली.

----

No comments:

Post a Comment