Friday 15 September 2017

‘मिशन फुटबॉल वन मिलीयन’

मुलांनी आरोग्य आणि आनंदासाठी फुटबॉल खेळावा-महेश झगडे

नाशिक दि. 15:- फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मिशन फुटबॉल वन मिलीयन उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये व्यायाम व क्रीडासंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न असून मुलांनी आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल खेळावा,  असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे  केले.

मिशन फुटबॉल वन मिलीयन कार्यक्रमाचे छत्रपती शिवाजी स्टेडीअम येथे  उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, आमदार सिमाताई हिरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, क्रीडा उपसंचालक रावसाहेब जाधव, महानगरपालिका शिक्षण सभापती यतीन पगार (पाटील), शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव, आंतरराष्ट्रीय खेळाड मोनिका आथरे, नरेंद्र छाजेड, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक आदी उपस्थित होते.

श्री. झगडे म्हणाले, देशभरात मिशन फुटबॉल वन मिलीयन उपक्रमातून आज एकाच दिवशी दहा लाख विद्यार्थी व खेळाड या खेळात सहभागी होत आहेत. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होवून विश्वचषक स्पर्धेत सहभागी भारतीय संघास शुभेच्छा देत आहे. आरोग्यसाठी आणि क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार हिरे आणि श्रीमती सांगळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. श्री. नाईक यांनी फुटबॉल खेळाप्रती जागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांना चार हजार फुटबॉलचे  वाटप केले असल्याची माहिती दिली.
यावेळी मान्यवरांनी फुटबॉल खेळून उपक्रमात सहभाग नोंदवला व भारतीय फुटबॉल संघाला शुभेच्छा फलकावर स्वाक्षरी करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सर्व खेळाडू, विद्यार्थी व उपस्थितांनी  फुटबॉल खेळामध्ये  सहभागी होत खेळाचा आनंद लुटला. या निमित्ताने विविध शाळांमध्ये आज चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र सोमवंशी यांच्या अवघा महाराष्ट्र फुटबॉलमयया गिताच्या सीडीचे विमोचन  करण्यात आले.

----

No comments:

Post a Comment