Friday 29 September 2017

‘जलयुक्त’मुळे टंचाई दूर

हनुमाननगरची पाणीटंचाई जलयुक्तमुळे झाली दूर


          नाशिक दि.29- निफाड तालुक्यतील हनुमाननगर गावात जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ग्रामस्थांच्या एकजूटीने झालेल्या या कामांमुळे शेतीसाठी विशेष लाभ होणार आहे.
          हनुमाननगर गावातून जाणाऱ्या रस्त्यामुळे गावाचे दोन भागात विभाजन होते. एका भागाला पालखेड कालव्याच्या पाण्याचा लाभ होत असे. मात्र उर्वरीत गावाला उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागे. गावातील गाडवे नाल्यावरील बंधाऱ्यातून गळती होत असल्याने पावसाळ्यानंतर शेततळी भरण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. विहिरींची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावल्यामुळे शेततळे भरण्यासही अडचणी निर्माण होत असत. अशा परिस्थितीत गतवर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 15 कामे करण्यात आली.

          गावनाल्यावरील पाच सिमेंट बंधाऱ्यांची लघु पाटबंधारे विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आली. या कामावर 22 लाख रुपये खर्च करण्यात आला. अत्यंत कमी खर्चात ही कामे झाली आणि 200 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. शाखा अभियंता अर्जुन गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामांसाठी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याने पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण करणे शक्य झाले.
          गावात दहा शेतकऱ्यांच्या विहिरींचे पुर्नभरण करण्यात आल्याने उन्हाळ्यात याचा फायदा होणार आहे. या कामासाठी साधारण दीड लाख खर्च करण्यात आला. पुर्नभरणामुळे विहिरींची पाणीपातळी बऱ्याच ठिकाणी काही फुटांवर आली आहे. पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाल्याने भाजीपाला उत्पादनासाठी या चा उपयोग होणार आहे.

          झालेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी शेततळी भरून घेतली असून पावसाळ्यानंतरही आणखी एकदा त्यात पाणी भरणे शक्य होणार आहे. उन्हाळी पिकांसाठी त्याचा विशेष उपयोग होणार आहे. जलयुक्तच्या या यशामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांचा उत्साहदेखील वाढला असून  या कामांची देखभालीची जबाबदारीदेखील त्यांनी स्विकारली आहे.

गोपीनाथ ढुबे, शेतकरी-कालवा असूनही पूर्वी अर्ध्या गावाला टंचाईचा सामना करावा लागे. ग्रामस्थांच्या एकजूटीमुळे आणि अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने जलयुक्तची कामे पुर्ण झाली. शंभराच्यावर विहिरींची पाणीपातळी वाढली असल्याने उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही आणि त्यातून शेत बहरेल असा विश्वास आहे.


---

No comments:

Post a Comment