Friday 1 September 2017

‘संवादपर्व’ नांदुर-मध्यमेश्वर

नांदूर मध्यमेश्वर येथे दाखल्यांसाठी विशेष मोहिम
संवादपर्व’ कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांची माहिती

            नाशिक दि.1- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नांदुर मध्यमेश्वर गावातील नागरिकांना आवश्यक असलेले दाखले  आणि शिधापत्रिका तयार करण्याबाबत येत्या सोमवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी केले.
          नांदुर-मध्यमेश्वर येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  ‘संवादपर्व उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार पुनम दंडिले आदी उपस्थित होते.

          श्री.पाटील म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्याकरिता मंडळ अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे ग्रामस्थांकडून आवश्यक माहिती घ्यावी. हे काम मोहिमस्तरावर करण्यासाठी सेतू केंद्राचे सहकार्य घेण्यात यावे. शासनामार्फत सातबारा नमुना ऑनलाईन देण्याची सुविध उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

          शेतीक्षेत्रात बाजारपेठेचा विचार करुन उत्पादन करावे, तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री.पाटील यांच्या हस्ते ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ मोहिमे अंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात रोटाव्हेटर पूर्वसंमती आणि विशेष सहाय्य योजनेच्या पुस्तिकांचे वितरण करण्यात आले.
          यावेळी श्री.ढेपे यांनी कृषी यांत्रिकीकरण योजना, ऊस रोपवाटीका, रोहयो अंतर्गत, रोहयो अंतर्गत गांडूळ खत तयार करणे, फळबाग योजना आदी योजनांची माहिती दिली. ऊसाच्या क्षेत्रात बदल करणे आवश्यक असून शास्त्रीयदृष्टीने लागवड केल्यास आणि ठिबकचा उपयोग केल्यास उत्पादन अधिक वाढेल, अशी माहिती त्यांनी दिली.

          श्रीमती. दंडिले यांनी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विविध योजनांची माहिती दिली. डॉ.गांगुर्डे यांनी ‘स्वाईन फ्ल्यू’ आणि ‘अवयवदान’ याबाबतची माहिती दिली.
प्रास्ताविकात डॉ.मोघे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्रितपणे विकासाचे उपक्रम राबवावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला मंडळ अधिकारी के.आर.जाधव, सरपंच प्रल्हाद पगारे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब भवर, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश इकडे, जालिंदर गाजरे, सोमनाथ गचाले, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment