Monday 18 September 2017

मोफत लसीकरण शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाईन फ्लू मोफत लसीकरणाचा शुभारंभ

नाशिक, दि. 18 :- पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील गरोदर मातांना मोफत स्वाईन फ्लू लसीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
          यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले, गरोदर मातांना स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मातांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी गरोदर मातांना सीएसआर आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला असून त्यासाठी सामाजिक संस्था आणि उद्योजकांचे सहकार्य मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आवश्यक काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळून येताच जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे  आवाहन त्यांनी केले.
          स्वाईन फ्लूवर वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार धोकादायक ठरू शकत असल्याने नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे डॉ.जगदाळे यांनी सांगितले.

श्री.महाजन यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

पालकमंत्री श्री.महाजन यांनी जिल्हा रुग्णलयातील नवजात बालक अतिदक्षता केंद्राला भेट देऊन बालमृत्युबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त डॉ.अभिषक कृष्णा, जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन यांनी दूरध्वनीवरून मुकुल माधव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच 16 बेबी वॉर्मर, 10 फोटोथेरेपी, 15 पल्सऑक्सीमीटर, 20 सिरींज पंप, एक बिलीरुबीनो मीटर आणि एक मोबाईल एक्सरे युनिट सप्टेंबर अखरेपर्यंत रुग्णालयाला मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
          स्वाईन फ्लू उपचारांसाठी आवश्यक 5 व्हेंटीलेटर लवकरच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गरोदर मातांचे वजन कमी असल्यास नवजात बालकांचेदेखील वजन कमी असते. त्यामुळे मातांना पोषण आहार योग्यरितीने मिळेल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
नाशिक येथे वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. संदर्भ रुग्णालयातील जागेबाबतही आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यास 90 तज्ज्ञ डॉक्टर्स उपचारासाठी उपलब्ध होतील,अशी माहिती त्यांनी दिली.

----

No comments:

Post a Comment