Friday 22 September 2017

‘स्वच्छता हीच सेवा’

आजारापासून मुक्ततेसाठी स्वच्छता राखा- गिरी महाजन

          नाशिक दि.22- स्वाईन फ्ल्यू, डेंग्‌यु, मलेरिया या प्रकारच्या आजारापासून शहर मुक्त करण्यासाठी नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखावी आणि वर्षभर कर्तव्यभावनेने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
          ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शहर स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, उपमहापौर प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, रोजच्या आचरणात स्वच्छतेची सवय असणे गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे रोगराईवर नियंत्रण आणता येते. तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडते. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगल्यास सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रधानंमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 2 ऑक्टोबरपर्यंत परिसर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवावेत. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टीकचा कचरा टाकू नये आणि थुंकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
          पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते शहर स्वच्छतादूत असलेल्या कविता राऊत, चित्रकार सावंत बंधु, प्रसाद पवार आणि अशोक दुधारे यांचा सत्कार करण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत  352 टन टन कचरा संकलीत

       शालीमार चौकापासून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सर्व मान्यवरांनी संत गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत परिसर स्वच्छतेत सहभाग घेतला. संत गाडगे महाराज पुतळ्याला पालकमंत्री महाजन यांनी अभिवादन केले.  शहरातील विविध 449 ठिकाणी स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कचरा संकलनासाठी 30 ट्रॅक्‌टर, 41 डंपर, 117 घंटागाड्या, 33 जेसीबी आदिंची  व्यवस्था करण्यात आली  होती. एकूण 28 हजार 819 अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. विविध ठिकाणाहून एकूण 352 टन कचरा संकलीत करण्यात आला.

 पालकमंत्र्यांनी स्वत: केले श्रमदान
          पालकमंत्री महाजन यांनी मोहिमेच्या शुभारंभापासून सकाळी 11 वाजेपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. संत गाडगेमहाराज पुतळ्यापासून परतत असतांना श्री.महाजन यांना दुभाजकाच्या मध्यावर कचरा आढळल्यावर त्यांनी वाहनांचा ताफा त्याच ठिकाणी थांबवून एक तास इतर स्वयंसेवकांसह श्रमदान केले. त्याच चौकात असणाऱ्या जुन्या कारंजाच्या टँकमध्ये  उतरुन त्यांनी स्वयंसेवकांच्या सहकार्याने तेथील कचरा काढला. या परिसरातून एक घंटागाडी भरून कचरा काढण्यात आला.

 त्यानंतर पालकमंत्र्यांनी संदर्भ रुग्णालय परिसरात जाऊन त्यांनी श्रमदान केले. रस्त्यात कचरा दिसेल त्या ठिकाणी  थांबून मंत्री महोदयांनी त्या परिसराची स्वच्छता केली आणि नागरिकांचे प्रबोधनही केले. त्यानंतर सिडको परिसरात जाऊन त्यांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
 श्री.महाजन यांनी पेलीकन पार्क येथे भेट देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली. परिसराची पूर्ण स्वच्छता करण्यात येऊन पार्कचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा  आणि यापुढे त्याठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.


जिल्हाधिकाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
         जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या  परिसरात मनपा कर्मचाऱ्यांसह श्रमदान केले. या ठिकाणाहून 3 टन कचरा संकलीत करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना नाल्यात कचरा न टाकण्याबाबत आवाहन केले.

----

No comments:

Post a Comment