Saturday 2 September 2017

अवयवदान चळवळीला गती

गणेशोत्सवाच्या माध्यमातून अवयवदान चळवळीला गती देण्याचा प्रयत्न
                       -गिरीष महाजन

नाशिक दि.2-गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करीत अवयवदान चळवळीला गती देण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक जाणिवेतून अधिकाधीक दात्यांनी अवयवदानाची नोंदणी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
पालकमंत्री संपर्क कार्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत पालकमंत्र्यांनी श्रीगणेशाची आरती केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता राजेश मोरे, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, लक्ष्मण सावजी, दादा जाधव, प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन म्हणाले, अनेक रुग्ण किडनी, यकृत, डोळे अशा अवयवांच्या प्रतिक्षेत आहे. 30 हजार रुग्ण प्रतिक्षा यादीत असताना केवळ 100 अवयव उपलब्ध होतात. मृत्युनंतर देहाची माती होत असल्याने अवयदानाच्या माध्यमातून आपल्या स्मृती कायम ठेवण्याबरोबर इतरांना नवे जीवन देता येते. या सामाजिक भानातून नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षापासून शासनाने आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे अवयवदान चळवळीला गती मिळत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपर्क कार्यालयात या विषयावर जनजागृती करण्यात येत असून अवयवदात्यांची नोंदणीदेखील करण्यात येत आहे. दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ज्येष्ठ नागरिक यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्याचा उपक्रमदेखील राबविण्यात आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.महाजन यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायलेली भजने ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.

----

No comments:

Post a Comment