Friday 8 September 2017

विकासकामांचे उद्घाटन

साहित्य पर्यटनाच्यादृष्टीने शिरवाडेचा विकास करा- जयकुमार रावल

          नाशिक दि.  8- साहित्य पर्यटनाच्यादृष्टीने शिरवाडे गावाचा विकास करण्यावर भर देवून गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
           निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पिंपळगाव बसवंतकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर, जि.प.बांधकाम व अर्थ समिती सभापती मनिषा पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतींद्र पाटील, जि.प.सदस्या मंदाकिनी बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश खोडे, पंचायत समिती निफाडचे सभापती पंडित आहेर, दादाजी जाधव आदी  उपस्थित होते.

          श्री.रावल म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन साहित्य पर्यटनाच्यादृष्टीने गावात नवीन संकल्पना राबविल्या जाव्यात. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल.
 गावाच्या विकासात शेतकऱ्यांची भुमीका महत्वाची असल्याने शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्त करणे आवश्यक  आहे.   गावाच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कल्पवृक्ष या योजनेच्या माध्यमातून गावात कामे करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

          पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कवीवर्य कुसुमाग्रज स्मारकाचे बांधकाम व पथदिप बसविणे, सर्व शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळा 10 नवीन खोल्यांचे बांधकाम, जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारत बांधणे, खासदार निधीतून कवीवर्य कुसुमाग्रज ग्रंथालय इमारत बांधणे, ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना व आदिवासी वस्ती रस्ता क्राँक्रीटीकरण करणे, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत श्रीशनीदेव मंदिर वाहनतळ उभारणे या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

घरकुल योजनेतून इंदिरा आवास घरकुल योजनेंतर्गत 126,  शबरी घरकुल योजनेंतर्गत 10, रमाई घरकुल योजनेंतर्गत 12 लाभार्थ्यांना मोबदला देण्यात आल्याची माहितीही यावेळी दिली.
खासदार चव्हाण यांनी यावेळी मनोगतात गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

----

No comments:

Post a Comment